मुंबई : थायलंड येथे एका गुहेमधून १२ मुले आणि त्यांचा २५ वर्षीय प्रशिक्षक यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. १३ जूनपासून १३ जण गुहेत फसले होते. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गुहेत पाणी घुसले. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे गुहेत पाणीच पाणी झाले. पाण्याची पातळी वाढत होती. त्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी १३ जण गुहेत आता जाता येईल तितके आत जात होते. दरम्यान, ठराविक अंतर गेल्यानंतर गुहेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत हे १३ जण अडकले होते. बाहेर मुसळधार पाऊस आणि गुहेत वाढणारे पाणी यामुळे त्यांना बाहेर काढायचे कसे, असा यक्ष प्रश्न होता. मृत्यू डोळ्यापुढे होता. त्यामुळे सर्वजण जीव मुठीत धरुन होते. अन्न-पाण्याशिवाय आणि ऑक्सिजनची कमतरता असताना या सर्वांनी मृत्यूवर कशी मात केली, याचीच जास्त चर्चा होतेय. दरम्यान, या मुलांचा प्रशिक्षक याची भूमिका यात महत्वाची ठरली. त्याने मुलांकडे योगा करुन घेतला. स्वत:ला धीर आणि संयम याचे प्रशिक्षण दिले. त्यांना जास्तीत जास्त धीर दिला. सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा दिली. ही प्रेरणा योगा केल्याने मिळाली.
गुहेतून बाहेर काढलेल्या फुटबॉल संघाचा पहिला व्हिडिओ जारी
गुहेतील उंच जागेवर अन्न-पाण्याशिवाय १२ दिवस काढले. त्यानंतर अडकलेल्या मुलांचा शोध लागला. त्यासाठी आंतराष्ट्रीय मदत घेण्यास आली. पाणबुड्यांच्या मदतीने त्यांचा शोध लागला आणि मदत कार्याला वेग आला. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली आणि त्याद्वारे ऑक्सिजन गुहेत पोहोचविण्यात आला. मात्र, अन्न नव्हते. दुसऱ्या दिवशी अधिक ऊर्जा देण्यारे अन्न पाकिटातून पुरविण्यात आले. मात्र, एवढे करुन उपयोगाचे नव्हते. मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचे आव्हान होते. ते प्रशिक्षकाने पेलले. त्यासाठी त्याने योगावर भर दिला. मुलांमधील धीर वाढविला. डोळे बंद करुन आत्मचिंतन करुन घेतले. मनाची एकाग्रता वाढू देण्यावर भर दिला. त्यामुळे या मुलांना मोठा आधार मिळाला. अत्यंत प्रतिकूल आणि कठिण परिस्थितीत मात करण्यासाठी योगा उपयोगी आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान योगावर भर देण्याची गरज आहे.
थायलंडमध्ये अडकलेल्या फुटबॉल संघातील १२ जणांना गुहेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. या मुलांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान या मुलांच्या नावांच्या बाबतीत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे. जी मुलं अजूनही गुहेत अडकली आहेत त्यांचे पालक आणि बाहेर काढण्यात आलेल्या मुलांच्या पालकांमध्ये काही गैरसमज होऊ नये यासाठी यासाठी ही काळजी घेण्यात आली होती. या मोहिमेत आस्ट्रेलिया, ब्रिटेन आणि यूरोपसह अन्य देश देखील थायलंडच्या मदतीला धावून आलेत. थायलंडच्या १६ वर्षांखालील फुटबॉलची ही टीम त्यांच्या २५ वर्षीय कोचसह २३ जूनपासून गुहेत अडकले होते.