आम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.... स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास केले बंद

Sweden Embassy : स्वीडन सरकारने पाकिस्तानमधील दूतावास अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. देशातील सध्याची परिस्थिती पाहता स्वीडनने हा निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 13, 2023, 06:28 PM IST
आम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.... स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास केले बंद title=
(फोटो सौजन्य - ANI)

Sweden : आपला शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) सध्या महागाईसह (inflation) विविध समस्यांना तोंड देत आहे. रोज नवं संकट हे पाकिस्तानच्या दारावर उभं ठाकलेलं पाहायला मिळत आहे. खास मित्र असलेला चीनही पाकिस्तानला मदत करण्यासाठी तितकासा उत्सुक असल्याचे दिसत नाहीये. त्यामुळे नागरिकांमध्ये हाहाकार उडालेला आहे. अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे भूकबळीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोफत अन्न धान्य मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

पाकिस्तानमध्ये एकीकडे देशपातळीवर असे संकट निर्माण झालं आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्री पातळीवरही या देशावर मोठी नामुष्की ओढवली आहे. स्वीडन सरकारने (Sweden Government) पाकिस्तानमधील दूतावास (Sweden Embassy) बंद केले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता स्वीडनने हा निर्णय घेतला आहे. इस्लामाबादमधील हे दूतावास स्वीडनने अनिश्चित काळासाठी बंद केल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सुरक्षेच्या कारणास्तव स्वीडनने हे दूतावास बंद केल्याचे म्हटले जात आहे.

दुसरीकडे तज्ज्ञांच्या मते, या निर्णयाचा थेट परिणाम पाकिस्तानच्या व्यापार, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाणीवर आणि महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रतिमेवर होणार आहे. स्वीडन सरकारच्या या निर्णयामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होणार आहे. या निर्णयावर पाकिस्तान सरकारने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

स्वीडनच्या दूतावासाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील सद्य परिस्थिती पाहता आम्ही हा निर्णय घेतला आहे. स्वीडनने सांगितले की त्यांच्या लोकांची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. "दूतावासातील स्थलांतरीतांच्या संदर्भातील विभाग या क्षणी कोणतेही अर्ज हाताळण्यास सक्षम नाही. तसेच, आम्ही आमच्या वाणिज्य दूतावास, गेरी, स्वीडन किंवा तुमच्या घराच्या पत्त्यावर कोणतीही कागदपत्रे पाठवू शकत नाही. आम्हाला माहिती आहे की यामुळे तुमची गैरसोय होईल. पण आमची अर्जदार आणि कर्मचारी सदस्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे," असे स्वीडन दुतावासाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

दुतावास कधी सुरु होणार या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी आम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला कोणत्याही समस्या असतील तर आमच्या संस्थेची संपर्क साधा, असेही निवेदनात म्हटलं आहे. दुसरीकडे स्वीडनमधील पाकिस्तानच्या दुतावासाने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "या वर्षी स्वीडिश विद्यापीठांमध्ये अर्ज करणारे अनेक पाकिस्तानी विद्यार्थी आम्हाला या बद्दल विचारत आहेत. आम्हाला आशा आहे की ते लवकरच व्हिसासाठी अर्ज करू शकतील. शिक्षण हा आपल्या नातेसंबंधाचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि विद्यार्थीचे दोन्ही देशांमधील दुवा म्हणून काम करतात," असे पाकिस्तानी दुतावासाने म्हटलं आहे.