Interesting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?

Interesting Fact : अवकाश... एक वेगळीच दुनिया. या आपल्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या विश्वात नेमकं काय सुरुये हे आपल्याला आता सहजपणे कळू लागलं आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 30, 2023, 03:49 PM IST
Interesting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?  title=
sun gives light to earth then why the space is dark know details

Interesting Fact : अवकाशासंबंधीच्या अनेक व्याख्या आपण अभ्यासात पाहिल्या, वाचल्या, पाठ केल्या. परीक्षेत त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही दिली. याच अवकाशाशी संबंधित अनेक रहस्य आपल्याला कायमच अवाक् करून गेली. खुद्द संशोधकांनाही बुचकळ्यात पाडणाऱ्या या अवकाशामध्ये कैक आकाशगंगा आहेत, असंख्य तारे आणि लघुग्रह आहेत. धुळीचे, दगडांचे, प्रचंड उष्णता असणारे ग्रहसुद्धा आहेत. याच अंतराळात धगधगता आणि पृथ्वीवर होणाऱ्या दिवस- रात्रीच्या चक्रासाठी कारणीभूत असणारा सूर्यही आहे. आज याच सूर्याविषयीची एक रंजक माहिती पाहुया. 

हल्ली सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. बरीच माहिती आपल्याला अतिशय सहजपणे मिळते आणि प्रत्येक वेळी ही माहिती हैराण करणारी असते. अशाच एका कुतूहलपूर्ण प्रश्नाचं उत्तर नुकतंच समोर आलं आहे. 

'सूर्यामुळं पृथ्वीवर उजेड पडतो, पण मग अंतराळात इतका अंधार का असतो?' असा प्रश्न 'कोरा' नामक एका संकेतस्थळावर विचारण्यात आला होता. त्यावर एका युजरनं उत्तर देत म्हटलं, 'काहींच्या मते आपण प्रकाशाला पाहू शकतो. तर, काहींना वाटतं की, धुलिकण एका बंद खोलीतही हवेत तरंगतात. पण, हा विचारच चुकीचा आहे. प्रकाशाला पाहण्यासाठी उजेड आणि त्याला परावर्तित करणारी एखादी गोष्ट असणं अतिशय गरजेचं असतं. अवकाशात मात्र यातील एकच गोष्ट उपलब्ध असते. मुळात उजेडाला स्वत:चं तेज नसतं. ज्या वस्तूंमधून प्रकाश बाहेर पडतो किंवा परावर्तित होतो त्या चमकू लागतात. अन्यथा या वस्तू काळ्याच दिसतात', असं कारण समोर आलं.  सूर्यावरून प्रकाश पृथ्वीवर येतो खरा, पण तो तेव्हाच पाहिला जातो जेव्हा तो एखाद्या कणावर पडतो. अवकाशात असा कण नसल्यामुळं प्रकाश पाहता येत नाही, असंही एक कारण तिथं समोर आलं. 

हेसुद्धा वाचा : धोका वाढतोय! प्रत्येक चौथा मुंबईकर 'या' शारीरिक व्याधीनं ग्रस्त

युनियन यूनिवर्सिटी वेबसाइटच्या एका अहवालानुसार अवकाशात कोणत्याही प्रकारचं वातावरण नाही, परिणामी इथं सूर्याची किरणं सरळ रेषेत प्रवास करतात आणि किरणं पसरत नाहीत. अवकाशात प्रकाशाला परावर्तित करणारे कण नसल्यामुळं ते शक्य होत नाही. याच कारणामुळं पृथ्वीवर उजेड असला तरीही अवकाशात अंधार पाहायला मिळतो.