विज्ञान क्षेत्रात चमत्कार, माणसाच्या शरिरात धडधडतंय चक्क डुकराचं हृदय

कोरोना (Corona) संकटाच्या काळात विज्ञान जगताला मोठं यश 

Updated: Jan 11, 2022, 01:05 PM IST
विज्ञान क्षेत्रात चमत्कार, माणसाच्या शरिरात धडधडतंय चक्क डुकराचं हृदय title=

First Heart Transplant : कोरोना (Corona) संकटाच्या काळात विज्ञान जगताला मोठं यश मिळालं असून डॉक्टरांनी विज्ञान क्षेत्रात चमत्कार घडवला आहे. 

अमेरिकेत एका ५७ वर्षीय व्यक्तीला चक्क डुकराचे हृदय बसवण्यात आलं आहे.  मानवाच्या शरिरात डुकराचे हृदय प्रत्यारोपण (genetically modified pig) करण्याची जगातील ही पहिल्या शस्त्रक्रिया (First heart transplant) आहे.  या प्रयोगामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अवयव दानाची (organ donation) तीव्र कमतरता दूर करण्यात मदत होऊ शकते.

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी या प्रत्यारोपणाला 'ऐतिहासिक' असं म्हटलं प्राणी ते मानव प्रत्यारोपणासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असं या निवेदनात म्हटलं आहे. डेव्हिड बेनेट या रुग्णाला मानवी प्रत्यारोपणासाठी योग्य मानलं जात नव्हतं परंतु त्याची प्रकृती खालावल्याने त्याचे प्राण वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

रुग्णाची प्रकृती कशी आहे?
यशस्वी प्रत्यारोपणानंतर ५७ वर्षीय डेव्हिड बेनेट यांची प्रकृती स्थिर असून शरीरात प्रत्यारोपित केलेला नवीन अवयव कसा काम करतो, यावर बारकाईने लक्ष ठेवून निरीक्षण केलं जात आहे.

मेरीलँड इथे राहणारे डेव्हिड बेनेट हे हृदयरोगाने त्रस्त होते, त्यांना पारंपारिक हृदय प्रत्यारोप किंवा कृत्रिम हृदय पंप बसवणं शक्य नव्हतं, मला जगायचं आहे आहे, असं बेनेट यांनी शस्त्रक्रियेपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या शरिरात डुकराचं हृदय बसवण्याचा एकमेव पर्याय डॉक्टरांसमोर होता. त्याला बेनेट यांनी सहमती दर्शवली.

त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत डुकराचं हृदय रोपण करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया तब्बल ९ तास सुरु होती. शस्त्रक्रियेनंतर बेनेट यांची तब्येत सुधारत असून ते व्हेंटिलेटरशिवाय स्वत: श्वास घेत आहेत. मी बरं झाल्यावर अंथरुणातून बाहेर पडण्याची वाट पाहत आहे, असं बेनेट यांनी म्हटलं आहे.

ही शस्त्रक्रिया भविष्यासाठी प्रभावी ठरेल
'ही एक यशस्वी शस्त्रक्रिया होती आणि अवयवांच्या कमतरतेचं संकट सोडवण्याच्या दिशेन हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल' असं यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर बार्टले ग्रिफिथ यांनी म्हटलं आहे. आम्ही सावधगिरी बाळगत आहोत, आणि आम्ही आशावादी आहोत की जगातील पहिली शस्त्रक्रिया भविष्यात रुग्णांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध करुन देईल. असं ग्रिफिथ यांनी म्हटलं आहे.

दरवर्षी लाखो लोकं अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करत असतात. दाता मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यूही होतो. पण या नवीन प्रयोगाने एक पर्याय समोर आला आहे.