Sri Lanka orders open fire on rioters: श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे. आता थेट आंदोलकांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने देशाच्या तिन्ही सैन्यांसाठी आदेश जारी केले आहेत कोणी सार्वजनिक मालमत्तेची लूट केली किंवा हिंसक निदर्शने केली तर त्याला गोळ्या घालाव्यात असे आदेश सैन्याला देण्यात आले आहेत.
राजपक्षे यांच्या घराला आग
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विधानानंतर लष्कराकडून हा आदेश देण्यात आला आहे. राजपक्षे यांनी हिंसाचार करू नये असं आवाहन केलं होतं. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि सरकारविरोधी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात आतापर्यंत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारीच महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर संतप्त आंदोलकांनी त्यांचं घर जाळलं.
सरकार समर्थक आणि सरकारविरोधी हिंसेनंतर श्रीलंकेची राजधानी कोलंबोत सैन्य तैनात करण्यात आलं असून कर्फ्यू लावण्यात आला आहे. सत्ताधारी नेत्यांनी देश सोजून पळून जाऊ नये यासाठी आंदोलकांनी काटूनायके विमानतळाकजे जाणाऱ्या रस्त्यावर ठिय्या मांडला आहे.
दुसरीकडे, भीषण हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना सोमवारी राजीनामा द्यावा लागला. माजी पंतप्रधान राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी कोलंबो सोडल्यानंतर त्रिंकोमाली येथील नौदल तळावर आश्रय घेतला आहे.
सोमवारी राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकार समर्थक आंदोलकांनी सुरू केलेल्या हिंसाचारानंतर, सरकारविरोधी आंदोलकांनी टेम्पल ट्रीला वेढा घातला आणि बळजबरीने कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षेसाठी लष्कर पाठवण्यात आले आणि पोलिसांनी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफगोळ्या सोडल्या. प्रत्युत्तरादाखल आंदोलकांनी निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केली आणि लष्कराने हवेत गोळीबार केला.
या हिंसाचारात एका खासदारासह किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.