श्रीलंकेत आंदोलनामुळे बिकट परिस्थिती, पंतप्रधानांनी जीव मुठीत घेऊन काढला पळ

श्रीलंकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. नागरिक सरकारविरोधात हिंसक आंदोलन करत आहेत.

Updated: May 10, 2022, 06:12 PM IST
श्रीलंकेत आंदोलनामुळे बिकट परिस्थिती, पंतप्रधानांनी जीव मुठीत घेऊन काढला पळ title=

कोलंबो : अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सोमवारी श्रीलंकेच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता. भीषण हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना सोमवारी राजीनामा द्यावा लागला. माजी पंतप्रधान राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी कोलंबो सोडल्यानंतर त्रिंकोमाली येथील नौदल तळावर आश्रय घेतला आहे.

राजपक्षे, त्यांची पत्नी शिरंती आणि त्यांचा धाकटा मुलगा रोहिता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थान टेम्पल ट्रीज येथून सुरक्षीत  हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण घेत नौदल तळावरआश्रय घेतला. राजपक्षे यांचा दुसरा मुलगा योसिता, जो माजी पंतप्रधानांचा सचिव देखील होता, असेही अहवालातून समोर आले आहे. सोमवारी त्यांचे कुटुंबीय देश सोडून निघून गेले.

हिंसाचारात एका खासदारासह किमान 5 जणांचा मृत्यू

सोमवारी राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकार समर्थक आंदोलकांनी सुरू केलेल्या हिंसाचारानंतर, सरकारविरोधी आंदोलकांनी टेम्पल ट्रीला वेढा घातला आणि बळजबरीने कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षेसाठी लष्कर पाठवण्यात आले आणि पोलिसांनी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफगोळ्या सोडल्या. प्रत्युत्तरादाखल आंदोलकांनी निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केली आणि लष्कराने हवेत गोळीबार केला.

या हिंसाचारात एका खासदारासह किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंका हे राष्ट्र सध्या सरकारशिवाय चालत आहे आणि सभापती महिंदा यापा अभयवर्धने यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना तातडीने संसद बोलावण्याची विनंती केली आहे. 31 मार्च रोजी डॉलरची चणचण आणि महागाईमुळे तीव्र आर्थिक संकटाला सुरुवात झाल्याने निदर्शने सुरु होती. राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन होत होते.

विरोधाच्या पार्श्वभूमीवर, मंत्रिमंडळाने राजीनामा दिला परंतु महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले. इंधन आणि गॅसचा तुटवडा आणि पण अनेक तास वीज खंडित झाल्याने लोक रस्त्यावर उतरले आणि सरकारने तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली.