इक्वेडोर : इक्वेडोरच्या (Ecuador) किनारपट्टीवरील ग्वायाकिल (Guayaquil) शहरातील तुरुंगात दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष (Prison Riot) झाला. या संघर्षात आतापर्यंत जवळपास 100 कैद्यांचा मृत्यू झाला आहे तर 52 जण जखमी झाले आहेत. तुरुंग अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सुमारे पाच तासांनंतर पोलीस आणि लष्कराने कारागृहावर पुन्हा नियंत्रण मिळवलं.
तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कैद्यांकडून अनेक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. 'लॉस लोबोस' (Los Lobos) आणि 'लॉस चोनेरोस' (Los Choneros) या दोन टोळ्यांमध्ये हिंसक संघर्ष सुरु झाला. हिंसाचारादरम्यान बंदुका आणि चाकू वापरण्यात आले आणि स्फोटही करण्यात आले. (Knives, Guns and Explosives) टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या दृष्यांमध्ये काही कैदी तुरुंगाच्या खिडक्यांमधून गोळीबार करताना दिसले, याच दरम्यान स्फोटही घडवून आणण्यात आले.
इक्वाडोरमध्ये टोळीयुद्ध वारंवार होत असतात. याआधी जुलै महिन्यात 100 पेक्षा जास्त कैद्यांचा तुरुंगातील हिंसाचारात मृत्यू झाला होता. यानंतर, अध्यक्ष गिलर्मो लेसो यांनी इक्वेडोरच्या तुरुंगात आणीबाणीची स्थिती घोषित केली होती.
तुरुंगातल्या हिंसाचाराच्या घटना इक्वेडोरमध्येच नाही तर इतर लॅटिन अमेरिकन (Latin America) देशांमध्येही होत असतात. अशा हिंसाचाराचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात.