भारत मोबाईल उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकाचा देश होईल- मोदी

'मेक इन इंडिया' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड म्हणून उदयाला आला आहे.

Updated: Oct 29, 2018, 08:03 AM IST
भारत मोबाईल उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकाचा देश होईल- मोदी title=

टोकियो: सरकराच्या 'मेक इन इंडिया' या उपक्रमामुळे भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्र प्रचंड वेगाने फोफावत आहे. उत्कृष्ट दर्जांच्या उत्पादनांमुळे या क्षेत्रांमध्ये भारत आता आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून नावारुपाला आलाय. विशेष करून मोबाईल निर्मितीच्या क्षेत्रात भारताने मोठी गगनभरारी घेतलेय. लवकरच भारत हा मोबाईल निर्मिती करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 

जपान दौऱ्यावर असलेल्या मोदींनी सोमवारी टोकियोतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने गेल्या साडेचार वर्षात केलेल्या कामगिरीचा पाढा वाचला. जगात 'मेक इन इंडिया' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड म्हणून उदयाला आला आहे. भारत सध्या एका मोठ्या स्थित्यंतराच्या प्रक्रियेतून जात आहे. माणुसकीची मुल्ये जपण्यासाठी भारताने दिलेल्या योगदानाचे जगभरातून कौतूक केले जातेय. भारताला केंद्रस्थानी ठेवून आखलेली धोरणे आणि जनतेसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रशंसा होत असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. 

यावेळी मोदींनी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचाही उल्लेख केला. गेल्यावर्षी भारताने एकाचवेळी १०० उपग्रह अवकाशात सोडून नवा विक्रम प्रस्थापित केला. तसेच कमी खर्चात चांद्रयान आणि मंगळयान मोहिमा यशस्वी करून दाखवल्या. मानवाला अंतराळात घेऊन जाणाऱ्या 'गगनयान'च्या निर्मिती सध्या भारताकडून सुरु आहे. त्यासाठी २०२२ पर्यंतचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे अंतराळयान पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असेल, असे मोदींनी सांगितले.