Russia Ukraine Crisis : पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन, यावर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत फोनवर चर्चा केली.

Updated: Mar 2, 2022, 11:31 PM IST
Russia Ukraine Crisis : पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन, यावर झाली चर्चा title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM ) यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांच्याशी युक्रेनच्या संकटाच्या (Ukraine Crisis) पार्श्वभूमीवर फोनवर चर्चा केली. दोन्ही प्रमुख नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला, विशेषत: खार्किवमध्ये जेथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. पीएम मोदींनी संघर्ष क्षेत्रातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबतही चर्चा केली आहे. 

युक्रेनवर रशियन सैन्याच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यातील हा दुसऱ्यांदा झालेलं संभाषण आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी शेवटचा संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी शांतीचं आवाहन केलं होतं.

आजचे दूरध्वनी संभाषण खार्किवमध्ये युक्रेनियन आणि रशियन सैन्यांमध्ये झालेल्या भीषण लढाईच्या पार्श्वभूमीवर झाले. सुमारे 4,000 भारतीय नागरिक युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर आणि पूर्व युक्रेनच्या काही भागात अडकले आहेत. बुधवारी, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी खार्किवमधून ताबडतोब बाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या वेळी पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांना भारतीय नागरिकांच्या विशेषत: युक्रेनमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंतेबद्दल अवगत केले होते. तसेच पुतिन यांना सांगितले की, भारतीयांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वोच्च प्राधान्य देतो.

भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु आहे. 26 फेब्रुवारी रोजी भारताने सर्व अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' ही रणनीती तयार केली. 27 फेब्रुवारी रोजी, परराष्ट्र मंत्रालयाने 'ऑपरेशन गंगा'ला समर्पित एक नवीन ट्विटर हँडल तयार केले. मायक्रोब्लॉगिंग साईटने ट्विटर हँडल अकाउंट आधीच व्हेरिफाय केले आहे.

भारत सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत 8 मार्चपर्यंत 46 उड्डाणे नियोजित आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की नियोजित उड्डाणेंपैकी 29 बुखारेस्टहून, 10 बुडापेस्टहून, सहा रेझोहून आणि एक कोसिसहून होती. आतापर्यंत एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसच्या 9 विशेष विमानांनी 2,012 हून अधिक भारतीय नागरिकांना परत आणले आहे.