Parking Disput In Neighbours:'सख्खे शेजारी पक्के वैरी', ही म्हण प्रचलीत आहे. असं असलं तरी शेजारधर्मही तितकाचं महत्त्वाचा असतो. पण शेजारी तसा प्रेमळ मिळणं कठीणच असतं. त्यामुळे अनेकदा भांडणं होतात. कधी कधी प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतं. त्यामुळे शेजारी आणि वाद हे काय नवीन नाही. असाच वाद ऑस्ट्रेलियात शेजाऱ्यांमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. गाडी पार्किंगवरून शेजारी एकमेकांना भिडले. विशेष म्हणजे हे भांडण हाणामारी किंवा शाब्दिक नव्हतं. शेजाऱ्यांची भांडण्याची पद्धत पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. शेजाऱ्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर स्टीकर लागून एकमेकांचे वाभाडे काढले. विचित्र भांडणात संतप्त शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्यावर कार आणि ट्रॉली विकत घेतल्याचा सांगत, इतरांना पार्किंगसाठी जागा मिळू नये, यासाठी असं करत असल्याचं आरोप केला आहे.
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टोयोटा कारवर अनेक स्टिकर्स चिकटवलेले दिसत आहेत. त्यावर शेजाऱ्यांनी खडे बोल सुनावले आहेत. या भांडणाची फेसबुक पेजवर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पहिल्या नोटमध्ये संतत्प शेजाऱ्याने लिहिलं आहे की, 'तुमच्या ड्राइव्हवेच्या उजव्या बाजूला इतरांना पार्किंग करण्यापासून रोखण्यासाठी कार आणि ट्रॉली खरेदी करणं चुकीचं आहे. तुमच्याकडे डबल गॅरेज आहे आणि जागा रिकामी आहे. हा सार्वजनिक रस्ता आहे जिथे पार्किंगचा अभाव आहे. सर्वांनी असेच वागले तर गाडी लावायला कुठेही जागा मिळणार नाही.'
यावर दुसऱ्या शेजाऱ्याने सहमती दर्शवली आहे. त्याने एक नोट लिहित, 'सहमत आहे! दिवसभर काम केल्यानंतर तुम्ही पार्किंगच्या शोधात गाडी चालवत राहता.' तर तिसऱ्या शेजाऱ्याने लिहिलं आहे की, 'आम्हाला मान्य आहे! आपण सर्वांनी एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. यामुळे आपल्याला आपल्या गाड्या घराजवळ पार्क करणं सोपं होईल." या भांडणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.