इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीत रविवारी धक्कादायक घटना घडली. हकीकी आझादी मार्चदरम्यान वृत्तवाहिनीची पत्रकार सदफ नईम यांची कंटेनरने चिरडल्याने मृत्यू झालाय. या अपघातानंतर इम्रान खान यांनी मोर्चा थांबवण्याची घोषणा केली. सदफ नईम (Sadaf Naeem) चॅनल 5 न्यूजची पत्रकार होती.
पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खान ज्या कंटेनरवर होते त्या कंटेनरखाली आल्याने महिला पत्रकाराचा मृत्यू झाला. वाहिनीसाठी इम्रान खानची खास मुलाखत घ्यायची होती. त्यामुळेच ती कंटेनरसमोर धावली आणि हा अपघात झाला. इम्रान खान यांची ही रॅली लाहोरमधील कामोके ते जीटी रोडकडे निघाली होती.
शोक व्यक्त करताना इम्रान खान म्हणाले की, या दुःखद अपघातामुळे मोर्चा थांबवला आहे. तिसर्या दिवशीच हा मोर्चा गुजदरनवालाला पोहोचणार होता. मात्र, आता ते सोमवारी चौथ्या दिवशी पोहोचतील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही या पत्रकाराच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले की, सदफ नईम ही अतिशय मेहनती रिपोर्टर होती.
इम्रान खान यांच्या कंटेनरला धडकल्याने महिला पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. तसेच या घटनेचा कोणताही व्हिडिओ समोर आलेला नाही. दुनिया टीव्हीच्या बातमीनुसार, सदफ तिच्या टीव्ही चॅनलसाठी खानची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत होती. मंत्री मरियम औरंगजेब यांनीही सदफच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून खान यांच्या कंटेनरने चिरडून पत्रकाराचा मृत्यू कसा झाला असा सवाल केला आहे.