इस्लामाबाद : पाकिस्तान एकिकडे भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवतोय तर दुसरीकडे 'ना'पाक हरकतीही सुरुच आहेत. पाकिस्ताननं काश्मीरच्या घटनांवर आणि दहशतवाद्यांवर पोस्टाची 20 तिकीट जारी केलीत. यामध्ये बुरहान वानीच्या नावाचाही समावेश आहे. बुरहान वानीचा उल्लेख 'शहीद' म्हणून करत पाकिस्तानानं हे स्टॅम्प जाहीर केलेत.
हे सर्व स्टॅम्प पेपर 8 रुपये किंमतीचे आहेत. यामध्ये काश्मीरच्या अनेक घटनांचा उल्लेख केलाय. यामध्ये सुरक्षादलाकडून ठार करण्यात आलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या नावावर पोस्टाची तिकीटही छापण्यात आलीत. तर केमिकल अटॅकवरही एक पोस्टाचं तिकीट छापण्यात आलंय. हे तिकीटं पूर्णत: चुकीच्या माहितीवर छापण्यात आलंय. कारण काश्मीरमध्ये कधीच केमिकल अटॅकची कोणतीही घटना घडल्याची माहिती नाही.
8 जुलै 2016 रोजी सुरक्षादलासोबत एका एन्काऊंटरमध्ये बुरहान वानी आणखी दोन दहशतवाद्यांसोबत ठार झाला होता. त्यानंतर दीर्घकाळापर्यंत काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला होता. हे 20 स्टॅम्प पेपर ई बे आणि इतर ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून विकले जात आहेत.
हे स्टॅम्पपेपर काश्मीर दिवसाला कराचीहून जारी करण्यात आले. यामध्ये काही दहशतवादी असेही आहेत जे गेल्या काही वर्षांत सुरक्षादलाकडून ठार करण्यात आलेत. ईबेवर हे स्टॅम्प पेपर 500 पाकिस्तानी रुपयांत उपलब्ध आहेत तर एका स्टॅम्पची किंमत 8 रुपये आहे.