इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका मुस्लिम महिलेला व्हॉट्सअॅपवर प्रेषित मोहम्मद यांच्या संबंधित मेसेज फॉरवर्ड करणं चांगलंच महागात पडलं आहे. ईशनिंदा केल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रावळपिंडी इथल्या न्यायालयाने महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मरेपर्यंत फाशीची शिक्षा
दोषी महिलेने प्रेषित मोहम्मद यांच्या छायाचित्रासह व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. याप्रकरणी दोशी महिलेला मरेपर्यंत फाशी द्यावी' असा निकाल न्यायालयाने सुनावला आहे.
२०२० झाली होती महिलेला अटक
26 वर्षीय महिलेला मे 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. या महिलेने व्हॉट्सअॅपवर ईशनिंदेचा मजकूर व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवला होता. तिच्या मित्रांनी तिला स्टेट्स बदलण्यासही सांगितलं होतं. पण या महिलेने स्टेट्स बदलण्याऐवजी तो संदेश इतरांना फॉरवर्ड केला.
इस्लाममध्ये प्रेषित मोहम्मद यांची छायाचित्र बनवणं किंवा ती ठेवण्यास सक्त मनाई आहे. तसंच पाकिस्तानमध्ये ईशनिंदा हा गंभीर गुन्हा मानला जातो. हा गुन्हा रोखणाऱ्या कायद्यात फाशीच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
पाकिस्तानच्या तुरुंगातील 80% कैद्यांवर ईशनिंदेचा आरोप
अमेरिकेच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांपैकी 80% कैद्यांवर ईशनिंदा केल्याचा आरोप आहे. या सर्व कैद्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
श्रीलंकन व्यक्तीची हत्या
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये ईशनिंदेचे एक प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये श्रीलंकेतील एका फॅक्टरी मॅनेजरला ईशनिंदेचा आरोप करत लोकांनी बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला जाळण्यात आलं होतं.