Pakistan Hikes Fuel Prices: पाकिस्तानमध्ये (Pakistan) महागाईने हाहाकार माजवला आहे. मिनी बजेट जाहीर करण्यात आल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने पेट्रोल आणि गॅसच्या (Fuel Price) किंमतीत ऐतिहासिक वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) कर्जाचा एक भाग मोकळा करावा यासाठी ही वाढ करण्यात आल्याचं वृत्त Geo News ने दिलं आहे. पेट्रोलच्या दरात प्रती-लिटरमागे 22 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता एका लीटरसाठी तब्बल 272 रुपये मोजावे लागत आहेत. वित्त विभागाच्या एका प्रसिद्धीपत्रकात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे ही वाढ करण्यात येत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान हाय-स्पीड डिझेलच्या दरात 17 रुपये 20 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यासह हा दर 280 रुपये प्रती-लिटर झाला आहे. तसंच केरोसिनसाठी एका लीटरमागे 202 रुपये 73 पैसे मोजावे लागत आहेत. केरोसिनच्या किंमतीत 12 रुपये 90 पैशांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान लाइट डिझेलच्या दरात 9 रुपये 68 पैशांची वाढ करण्यात आली असून हा दर लीटरमागे 196 रुपये 68 पैसे झाला आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत.
पाकिस्तानने पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत वाढ केल्याने आधीच महागाई वाढलेली असताना त्यात आणखी भार सोसावा लागणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली वाढ पाहता पाकिस्तानमधील महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Moody's Analytics शी संबंधित असणाऱ्या ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ कतरिना एल यांनी 2023 च्या पहिल्या सहामाहीत पाकिस्तानमधील महागाई कमी होण्याआधी सरासरी 33 टक्क्यांनी वाढू शकते असा अंदाज वर्तवला होता. तसंच केवळ IMF कडून मिळणारी बेलआउट अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची शक्यता नाही असंही म्हटलं होतं.