नवी दिल्ली : पाकिस्तानची अर्थव्यवस्था समर्थपणे हाताळण्यास पंतप्रधान इम्रान खान सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून येतंय. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळताना दिसतेय. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया बुधवारी १६४ वर पोहचलाय. इंटर बँकिंग ट्रेडमध्ये ही स्थिती दिसतेय. तर खुल्या बाजारात याच पाकिस्तानी रुपया १६० रुपयांच्या स्तरावर पोहचलाय. बुधवारी पाकिस्तानी रुपयाची किंमत एका डॉलरच्या तुलनेत ७.२ रुपयांनी घटली.
पाकिस्तानमध्ये महागाईनं कळस गाठलाय. या आठवड्यात पाकिस्तानात सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. बुधवारी पाकिस्तानात सोन्याची किंमत ८०,५०० रुपये प्रती १२ ग्रॅम दरावर पोहचला.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर डॉक्टर रजा बकीर यांनी गेल्या आठवड्यात 'पाकिस्तानी रुपयातली ही घट काही वेळेपुरती' असल्याचं म्हटलं होतं... पाकिस्तानात सद्य आर्थिक वर्ष ३० जून रोजी समाप्त होणार आहे. अनेक कंपन्यांना ३० जूनपर्यंत आपले आंतरराष्ट्रीय देणी द्यायची आहेत. त्यामुळे त्यांना डॉलरची गरज भासतेय... त्यामुळे पाकिस्तानी रुपयावर हा परिणाम जाणवतोय, असंही बकीर यांनी म्हटलं होतं. परंतु, आता झालेल्या किंवा होत असलेल्या बदलाचे परिणाम सामान्य पाकिस्तानी जनतेला दीर्घकाळापर्यंत भोगावे लागतील असं दिसतंय.
उल्लेखनीय म्हणजे, इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर आरुढ झाल्यानंतर गेल्या १० महिन्यांत पाकिस्तानी रुपयात जवळपास २९ टक्क्यांनी घट नोंदवण्यात आलीय. गेल्या वर्षी १८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानी रुपया १२३.२५ च्या दरावर होता.