'माझाच बॉस होऊ शकेल, त्याला नोकरी देण्यास प्राधान्य'

येणारा काळ कसा असेल, हे स्पष्टपणे सांगू शकणारा कोणीही तज्ज्ञ नाही.

Updated: Jan 24, 2019, 09:40 AM IST
'माझाच बॉस होऊ शकेल, त्याला नोकरी देण्यास प्राधान्य' title=

दावोस - येणारा काळ कसा असेल, हे स्पष्टपणे सांगू शकणारा कोणीही तज्ज्ञ नाही. प्रत्येक जण फक्त भूतकाळाबद्दलच बोलत असतो. त्यामुळे कोणत्याही उद्योगपतीने स्पर्धक आणि वाढता दबाव या विषयी चिंतीत होण्याची गरज नाही. जर कोणाला दबावाची भीती वाटत असेल, तर त्याने उद्योगक्षेत्रात न येणेच चांगले, असे चीनमधील प्रख्यात उद्योगपती आणि 'अलिबाबा'चे कार्यकारी संचालक जॅक मां यांनी म्हटले आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या व्यासपीठावरून त्यांनी हे वक्तव्य केले. सध्या सगळेच जण आजूबाजूच्या घटनांबद्दल चिंतीत आहे, ही चांगली बाब असल्याचेही अलिबाबा यांनी म्हटले आहे.

गेल्या २० वर्षात अलिबाबा कंपनीला पुढे घेऊन जाताना तुम्हाला कधी भीती वाटली का, असा प्रश्न विचारल्यावर त्यावर उत्तर देताना जॅक मां म्हणाले की, येणाऱ्या भविष्याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही. कोणाला काही सांगता येणारही नाही. पण सगळेच जण भूतकाळात काय घडले, याबद्दल बोलत असतात. त्यामुळे व्यतीत झालेल्या भूतकाळाचे सगळे तज्ज्ञ असतात. भविष्याचे तज्ज्ञ कोणीच नसतात. अलिबाबा कंपनीमध्ये कोणत्या स्वरुपाच्या लोकांना नियुक्त केले जाते, असा प्रश्न विचारल्यावर त्यावर जॅक मां म्हणाले की, कोणाचीही माझ्या कंपनीत नियुक्ती करताना मी सर्वात आधी तो माझ्यापेक्षा स्मार्ट आहे का, याचा अंदाज घेतो. ज्यांच्यामध्ये चार ते पाच वर्षांत माझाच बॉस होण्याची कुवत असेल, अशाच लोकांना कंपनीमध्ये घेण्याला प्राधान्य दिले जाते. जे लोक आजूबाजूला घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मकपणे पाहतात. जे कधीच हार पत्करण्यास तयार नसतात. त्यांनाच मी माझ्या कंपनीत नियुक्त करण्यात उत्सुक असतो, असेही जॅक मांने म्हटले आहे.