कोरोनाबाधित ट्रम्प यांच्या तब्बेतीबाबत चीफ ऑफ स्टाफकडून महत्वाची माहिती

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा आपण मास्क वापरणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं

Updated: Oct 4, 2020, 10:22 AM IST
कोरोनाबाधित ट्रम्प यांच्या तब्बेतीबाबत चीफ ऑफ स्टाफकडून महत्वाची माहिती  title=

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्रपती (US President) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कोरोनाची लागण झाली आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्बेतीचे पुढील ४८ तास हे अत्यंत महत्वाचे आहेत. ट्रम्प यांच्यावर सैन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमधून मिलिट्री हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यापूर्वी ऑक्सिझन लावावं लागलं होतं. मात्र, व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांच म्हणणं आहे की, त्यांना साधारण लक्षणे आहेत. 

वाल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी याची माहिती दिली. नेवी कमांडर डॉ. सीन कॉनले आणि इतर डॉक्टरांनी ब्रीफिंग केल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे दिली. 

शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 

ट्रम्प यांनी ट्विट करून दिली माहिती 

आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगत लवकरच करोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन असं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. मला बरं वाटावं म्हणून वॉल्टर रिड मेडिकल सेंटरचे डॉक्टर्स, नर्सेस हे प्रचंड मेहनत घेत आहेत. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या सगळ्यांचं कार्य पाहून मी थक्क झालोय.

गेल्या सहा महिन्यात ज्या ज्या रुग्णांनी करोनावर मात केली त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अमेरिका ही एक महासत्ता आहे. जगात अमेरिकेचा दबदबा आहे या अमेरिकेसाठी मी लवकरच करोनामुक्त होऊन परत येईन असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे.