Nepal Plane Crash Latest News: काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे. विमान टेक ऑफ करताना क्रॅश होऊन अपघात घडला आहे. यावेळी विमानात 19 प्रवासी होते. तर. आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सौर्य एअरलाइनचं हे विमान असल्याचे समोर येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
द काठमांडू पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान काठमांडूवरुन पोखरा येथे जात होते. टेक ऑफ करताना रनवेवरुन घसरल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सौर्य एअरलाइनचे विमान नंबर 9N-AME (CRJ 200)चा अपघात झाला आहे. अपघातानंतर विमानातून आगीचे लोट बाहेर पडत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मदत व बचतकार्य सुरू करण्यात आले आहे. बचावपथकाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आग विझवण्यात आली आहे. तर, आत्तापर्यंत 17 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर, अन्य प्रवाशांचा शोध सुरू आहे. या अपघातातून पायलट बचावला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा येताच त्याच्याकडे अपघाताविषयी चौकशी करण्यात येणार आहे.
#WATCH | Plane crashes at the Tribhuvan International Airport in Nepal's Kathmandu. Details awaited pic.twitter.com/tWwPOFE1qI
— ANI (@ANI) July 24, 2024
या विमान अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. यात दिसतंय की, विमानातून आगीच्या ज्वाळा बाहेर येत आहेत. या अपघातानंतर त्रिभुवन विमानतळावरील अन्य विमानांच्या सेवांवरही परिणाम झाला आहे. या अपघातानंतर त्रिभुवन विमानतळावर लँड होणाऱ्या विमानांची लँडिग लखनौ आणि कोलकात्ता येथे वळवण्यात आल्या आहेत.