Myanmar Military Airstrike : संपूर्ण जगाच्या नजरा वळपणारी घटना म्यानमारमध्ये घडल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी मध्य म्यानमारमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जमावावर सैन्यदलाकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक अर्थात हवाई हल्ल्यामध्ये जवळपास 100 जणांचा बळी गेला. लष्करी शासनाचा विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हे नागरिक उपस्थित होते. दरम्यान, सदर हल्ल्यात मृतांंमध्ये बऱ्याच निष्पाप लहान मुलांचाही समावेश असल्याची काळीज पिळवटणारी माहिती समोर येत आहे.
2021 पासूनच म्यानमारमध्ये लष्करी शासनाचा विरोध करण्यासाठी हवाई हल्ले आणि तत्सम कारवायांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत इथं सैन्याच्याच हल्ल्यात जवळपास तीन हजारहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानवाधिकार प्रमुखांनीही Sagaing येथे एका सामाजिक कार्यक्रमांच्या स्थळी करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्याचा विरोध करत ही घटना हादरवणारी असल्याची प्रतिक्रिया दिली.
Our deepest condolences, prayers & thoughts are with the families, love ones, relatives, friends of the victims & the entire population of #Myanmar which have suffered so much for so long under the #GenocidalMyanmarJunta's brutal reign of terror. #WhatsHappeningInMyanmar pic.twitter.com/1rLy2H13uc
— Dr. Sasa (@DrSasa22222) April 11, 2023
प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या हल्ल्यामध्ये व्यासपीठावर नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलांचाही बळी गेला आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या जवळपास 30 च्या घरात असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, सध्याच्या घडीला हल्ल्याचं स्वरुप पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आलीये.
म्यानमारमधील लष्करी शासनाचे प्रवक्ते मेजर जनरल ज़ॉ मिन टुन यांनी स्थानिक शासकीय वाहिनीशी दूरध्वनीवरून संवाद साधताना दिलेल्या माहितीत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. शासनविरोधी गटाच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा सुरु असतानाच हा हल्ला केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे, तर समाजातील या घटकांवर हिंसक आंदोलनं भडकवण्याचा गंभीर आरोपही लावला.
म्यानमारमधील या घटनेनंतर हा संघर्ष नेमका पेटला का? हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. 1 फेब्रुवारी 2021 ला म्यानमारमध्ये लष्करानं सत्ता काबिज केली होती. यानंतर देशात आणीबाणीची घोषणाही करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात म्यानमारच्या धडाडीच्या नेत्या आंग सान सू की आणि नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या इतरही नेत्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर देशभरात लोकशाहीच्या मागणीवरून वादंग माजत मोठ्या प्रमाणात जाहीर विरोध प्रदर्शनास सुरुवात झाली होती. त्या क्षणापासून लष्करानं टोकाची पावलं उचलल्याचं पाहायला मिळालं.