वॉशिंग्टन : अटलांटिक महासागरात उठलेल्या शतकातल्या सर्वात मोठ्या इरमा चक्रीवादळानं अनेक कॅरेबियन बेटं उध्वस्त केलीयेत. या वादळात आतापर्यंत किमान 17 जणांचा बळी गेला असून सुमारे 12 लाख लोकांना वादळाचा फटका बसल्याचा अंदाज आहे. मात्र हा आकडा थेट 26 लाखांपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज आहे.
उद्या किंवा परवा इरमा अमेरिकेच्या किनाऱ्यांवर थडकण्याची शक्यता आहे. फ्लोरिडा आणि जॉर्जिया या दोन राज्यांना त्याचा सर्वात मोठा दणका बसेल, असं मानलं जातंय. मात्र संपूर्ण नैऋत्य अमेरिकन किनारपट्टीनं सावध राहण्याची गरज असल्याचं अमेरिकेच्या आपत्कालिन यंत्रणेचे प्रमुख ब्रुक लाँग यांनी म्हटलंय. हे वादळ अमेरिकेमध्ये मोठा उत्पाद घडवू शकतं असं मानलं जातंय.
दरम्यान, अमेरिकेच्या नॅशनल हरिकन सेंटरनं वादळाची तीव्रता पाचवरून चारपर्यंत खाली आणलीये. इरमामधल्या वाऱ्यांचा वेग काहीसा कमी झाला असला तरी ताशी आडीचशे किलोमीटर वेगानं वाहणारे वारे मोठा विध्वंस घडवू शकतात.