'मिरॅकल ऑन हडसन', नदीत लॅन्डिंग करणाऱ्या विमानाचा इतिहास

विमानासमोर हवेत कॅनडा गीस या पक्ष्यांचा प्रचंड थवा आला आणि... 

Updated: Jun 29, 2018, 11:05 AM IST
'मिरॅकल ऑन हडसन', नदीत लॅन्डिंग करणाऱ्या विमानाचा इतिहास  title=

मुंबई : गुरुवारी मुंबईतल्या घाटकोपर विमान दुर्घटनेत महिला वैमानिकासह पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. एखादा विमान अपघात घडला की एका घटनेची आठवण नक्की होते... न्यूयॉर्कमधलं फ्लाईट १५४९... हडसन नदीच्या पात्रामध्ये झालेलं वॉटरलँडिंग... एका चित्रपटाला विषय मिळवून देणारी ही घटना आजही अनेकांच्या लक्षात आहे. १५ जानेवारी २००९... न्यूयॉर्कच्या 'ला गार्डीया' विमानतळावरून नेहमीप्रमाणे दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी यूएस एअरवेजच्या एअरबस ३२० या फ्लाईट १५४९ ने उड्डाण केलं. ५७ वर्षांचे वैमानिक चेल्सी सलीनबर्गर यांच्या हाती या विमानाची धुरा होती. १९,६६३ तासांचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता... तर सहवैमानिक होते कॅप्टन जेफ्री स्कील्स... 

विमानाने उड्डाण केल्यावर अवघ्या दोन मिनिटांतच विमानासमोर हवेत कॅनडा गीस या पक्ष्यांचा प्रचंड थवा आला... त्यातल्या काही पक्षांच्या धडकेमुळे विमानाची दोन्ही इंजिनं जळून निकामी झाली... विमानात असलेल्या १५० प्रवाशांचे प्राण आता कॅप्टन सलीनबर्गर यांच्या हाती होते... 

इंजिनं जळून गेल्यामुळे विमानाचं रूपांतर एका अतिप्रचंड अशा ग्लायडरमध्ये झालं होतं... इंजिन निकामी झाल्यावर १९ सेकंद विमान उड्डाणाच्याच स्थितीत होतं. त्या दरम्यान विमान तब्बल ३०६० फुटांवर पोहोचलं होतं... तब्बल ताशी ३४० किलोमीटर या वेगाने विमान जाणारं विमान न्यूयॉर्क शहराच्याच आकाशात होतं... 

विमान पुन्हा वळवून ला गार्डिया विमानतळावर नेणं किंवा क्रॅश लँडींग करणं असे दोन पर्याय होते... मात्र या दोन्ही पर्यायांमध्ये जीवितहानीचा मोठा धोका होता...१९ सेकंदांनंतर विमान वेगानं कोसळण्यास सुरूवात झाली. विमान ३९० किमी वेगानं १६५० फूट उंचीपर्यंत खाली आलं. न्यूयॉर्क टर्मिनल रडार अॅप्रोच कंट्रोलला परिस्थितीची कल्पना अक्षरशः एका वाक्यात दिली आणि ला गार्डीया विमानातळाकडे जाणं अशक्य असल्याचं स्पष्ट केलं. सलीनबर्गर यांना न्यू जर्सीतल्या टोरोबोरो विमानतळावर उतरण्याची परवानगी देण्यात आली. पण तेही शक्य नसल्याचं सलीनबर्गर यांनी ताडलं. त्यांना खाली दिसत होतं ते हडसन नदीचं भव्य पात्र...

सलीनबर्गर यांनी त्यांचा निर्णय अप्रोच कंट्रोलमधल्या अधिकाऱ्यांना सांगितला... आजवर कुणीच असं काही ऐकलं नव्हतं... पण सलीनबर्गर ठाम होते. जॉर्ज वॉशिंग्टन या पुलापासून अवघ्या ९०० फुटांवरून हे विमान हडसन नदीकडे झेपावलं आणि काही क्षणांत हडसनमध्ये त्याचं वॉटरलँडिंग झालं...

दरम्यानच्या काळात एअर ट्राफिक कंट्रोलनं कोस्ट गार्डला याची कल्पना दिली होती... वॉटर लँडींग करता क्षणी कोस्ट गार्डच्या बोटी विमानाच्या जवळ पोहोचल्या... विमान तातडीनं रिकामं करण्यात आलं आणि विमानतले १५० प्रवासी आणि ५ कर्मचाऱ्यांना सहीसलामत बाहेर काढण्यात आलं. जवळपास १०० प्रवाशांना हलक्या स्वरूपाच्या जखमा झाल्या. मात्र या अपघातात एकही बळी गेला नाही. 

या अपघाताला जगात 'मिरॅकल ऑन द हडसन' असं संबोधलं जातं... व्यावसायिक वापराच्या विमानाचं यशस्वी वॉटर लँडींग करणं आणि त्यातल्या सर्वच्या सर्व प्रवाशांचा जीव वाचणं ही आत्तापर्यंत एकमेव घटना... चेल्सी सलीनबर्गर आणि जेफ्री स्कील्स या वैमानिकांनी हा इतिहास घडवला. त्यामुळे वैमानिक, सहवैमानिक आणि फ्लाईट अटेंडण्ट्सचा पायलट्स गिल्डतर्फे मास्टर्स मेडल देऊन सन्मान करण्यात आला... विमान अपघातांचा विषय निघाल्यावर हडसन नदीवर घडवलेला हा चमत्कार विसरणं केवळ अशक्य...