शिकागो : Mass Shooting in Chicago During Fourth July Parade: धक्कादायक बातमी. अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. (Chicago Shooting) शिकागोमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये 22 वर्षीय मुलाने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी, 4 जुलै रोजी शिकागोमधील इलिनॉयच्या हायलँड पार्कमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडदरम्यान एका तरुणाने अचानक गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाज ऐकून गोंधळ उडाला. अनेक लोक सैरावैरा पळू लागले. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 24 हून अधिक जण जखमी झाले. स्थानिक वृत्तानुसार, एका बंदूकधाऱ्याने किरकोळ दुकानाच्या छतावरून परेडवर गोळीबार केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
सोशल मीडियावर हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये परेड सुरू झाल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी गोळीबार केल्यानंतर लोक सैरभैर धावताना दिसत आहेत. त्याचवेळी गोळीचा आवाजही स्पष्टपणे ऐकू येतो. शहर पोलीस कमांडर ख्रिस ओ'नील म्हणाले की, "यावेळी, 24 लोकांना हायलँड पार्क रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर, हायलँड पार्क शहरातील 4 जुलैचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. लोकांनी हायलँड पार्कमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हल्ल्याच्या काही तासांनंतर पोलिसांनी या गोळीबारातील एका संशयिताला अटक केली. आरोपी 22 वर्षांचा असून रॉबर्ट क्रेमो असे त्याचे नाव आहे. लेक काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितले की, आरोपी क्रेमो कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरु आहे. हल्ल्याचा इतर अनेक बाजूंनी तपास सुरु आहे. गोळी लागल्याने सुमारे 24 जण जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या हल्ल्यानंतर अमेरिकेतील नेत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अनेकांचा जीव गेला आहे आणि बरेच जण जखमी झाले आहेत. हल्ल्यातील सर्व बळी आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.