पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद सुरु असतानाच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर पाच दिवसांचा दौरा संपवून ते मायदेशी परतले आहेत. दरम्यान मायदेशी परतताच त्यांचे सूर बदलले असून, आम्हाला धमकावण्याचा परवाना कोणाकडे नाही असं विधान केलं आहे.
मुइज्जू म्हणाले आहेत की, "आम्ही एक लहान देश असू शकतो. पण याचा अर्थ कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही". मुइज्जू यांनी यावेळी प्रत्यक्षपणे कोणाचंही नाव घेतलं नाही. पण त्यांचं हे विधान भारताला लक्ष्य करुन असल्याचं बोललं जात आहे.
चीनचे समर्थक मानले जाणारे मुइज्जू यांनी आपल्या 5 दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. त्यांचा हा दौरा अशावेळी झाला जेव्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने विरोधक गदारोळ घालत आहेत आणि संबंधित 3 मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन दोन्ही देशातील राजकीय संबंधात तणाव निर्माण झाला आहे. भारतीयांनी तर मालदीवविरोधात बहिष्काराची मोहीम सुरु असून तेथील दौरे रद्द केले आहेत.
भारतीयांकडून बहिष्काराची मोहीम चालवली जात असताना मुइज्जू यांनी चीनकडे विनंती करत जास्तीत जास्त पर्यटकांना मालदीवला पाठवावं असा आग्रह केला होता. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मुइज्जू म्हणाले होते की, कोविडच्या आधी चीनमधून सर्वाधिक पर्यटक मालदीवमध्ये येत होते. चीनने पुन्हा एकदा पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी अधिक प्रयत्न करायला हवे.
मुइज्जू यांचा हा पहिला चीन दौरा होता. पण हा दौरा अशावेळी झाला जेव्हा देशात नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या टिप्पणीमुळे वाद सुरु आहे. नरेंद्र मोदी यांनी लक्षद्धीपमधील पर्यटन वाढवण्याच्या हेतून केलेल्या दौऱ्यानंतर मालदीवमधील तीन मंत्र्यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. टीका झाल्यानंतर त्यांनी या पोस्ट डिलीट केल्या होत्या. पण वाद इतका वाढला होता की, तिन्ही मंत्री मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद यांना निलंबित करण्यात आलं होतं.
भारतातून मोठ्या संख्येने पर्यक मालदीवमध्ये जात असतात. 2023 मध्ये एकूण 17 लाख 57 हजार 939 पर्यटक मालदीवला गेले होते. यातील सर्वाधिक संख्या भारतीयांची होता. भारतातील 2 लाख 9 हजार 198 पर्यटक तिथे गेले होते. भारतानंतर रशिया आणि चीनमधील पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे.
यापूर्वी 2022 मध्ये 2.41 लाख भारतीय मालदीवला भेट देण्यासाठी गेले होते, 2021 मध्ये 2.91 लाख आणि 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळातही 63000 भारतीय मालदीवला भेट देण्यासाठी गेले होते.