Love Birds: काय सांगता... लव्ह बर्ड्समुळे गंभीर आजारांचा धोका?

लव्ह बर्ड्स पाळणं हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका व्यक्तीला फुफ्फुसांचा आजार लव्ह बर्ड्समुळे झाला असल्याचे समाेर आले आहे. 

Updated: Jan 20, 2023, 10:06 PM IST
Love Birds: काय सांगता... लव्ह बर्ड्समुळे गंभीर आजारांचा धोका?  title=

अरूण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे: पक्षी हे निसर्गाचे सौंदर्य वाढवतात. त्यातून आपल्या पृथ्वीवर विविध रंगाचे रूपाचे आणि जातीचे पक्षी आहेत. काहीजणं पक्षी पाळतानाही दिसतात. अनेक जणांचा वावरही पक्षांच्याजवळ जास्त असतो. काहींना लव्ह बर्ड्सही पाळण्याची सवय असते. परंतु तुम्हाला माहितीये का की लव्ह बर्ड्स पाळणं हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका व्यक्तीला फुफ्फुसांचा आजार लव्ह बर्ड्समुळे झाला असल्याचे समाेर आले आहे. 

दिसायला सुंदर..गोड गळ्याचे आणि पाहताक्षणीच कुणीही प्रेमात पडावं असेच हे लव्ह बर्ड्स...अलिकडच्या काळात लव्ह बर्ड पाळण्याचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. मात्र सुंदर दिसणारे हे गोड गळ्याचे पक्षी तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात. लव्ह बर्ड्समुळे फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. पुण्यात नुकताच एका व्यक्तीच्या फुफ्फुसाचं प्रत्यारोपण करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय हिस्ट्री जाणून घेतली त्यांनी घरात लव्ह बर्ड्स पाळल्याचं समोर आलं.  

काय आहेत लक्षणे? 

लव्ह बर्ड्स किंवा कबुतरांच्या पंखातून किंवा विष्टेतून बुरशी पसरण्याचा धोका असतो. बुरशीमुळे एलर्जी, दमा, खोकला असे आजार होऊ शकतात. रूग्णांमध्ये डोळ्यांची जळजळ, शिंका येणं, सायनसचा त्रास यांसह हायपर सेन्सिटिव्हिटी अशी लक्षणं दिसून येतात अशी माहितीही तज्ञांनी दिली. कधीकधी फुप्फुसदेखील निकामी होतात. त्यामुळे तुम्ही घरात लव्ह बर्ड्स पाळत असाल किंवा लव्ह बर्ड्स पाळण्याचा विचार करत असाल तर सावध राहा. या पक्षांचं स्थान घरातल्या पिंज-यात नाही तर निसर्गात आहे. त्यामुळे माणूस आणि वन्यजीव संपदा सुरक्षित राहिल आणि निसर्गाचा समतोलही राखला जाईल.