कमला हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी, विजयी होताच अमेरिकेत रचणार इतिहास

कमला हॅरिस यांच्या आई मूळच्या भारतीय

Updated: Aug 12, 2020, 09:28 AM IST
कमला हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी, विजयी होताच अमेरिकेत रचणार इतिहास title=

वॉशिंग्टन : अमेरिकेतील डेमोक्रेटिक पार्टी (American Democratic Party)कडून राष्ट्राध्यक्षपदासाठी (President Candidate) जोए बिडेन यांची निवड झाल्यानंतर आता उपराष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांची निवड झाली आहे. त्या भारतीय-जमैकन मूळच्या अमेरिकन आहेत. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

पहिल्यांदाच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी कोणत्या भारतीय-अमेरिकी (Indian- American) महिलेला मुख्य पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. जर कमला हॅरिस निवडणूक जिंकतात तर उपराष्ट्राध्यक्ष बनणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. याआधी गेराल्डाइन फरेरो (1984) आणि सारा पालिन (2008) यांचा पराभव झाला होता.

डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जोए बिडेन यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, 'मला सांगताना अभिमान वाटतो आहे की, मी कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवार म्हणून निवड केली आहे. शूर योद्धा आणि अमेरिकेची एक उत्कृष्ट लोकसेवक कमला हॅरिस माझी सहकारी असेल.

कमला हॅरिस यांनी ही ट्विट करत बिडेन यांचे आभार मानले आहे. 'बिडेन अमरिकेच्या लोकांना एक करु शकतात. कारण ते संपूर्ण जीवन आपल्यासाठी लढले. राष्ट्राध्यक्ष म्हणून ते एक असा अमेरिका बनवतील जो आपल्या आदर्शांवर खरा उतरेल. मी माझ्या पक्षाकडून उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी म्हणून त्यांच्यासोबत असल्याचा मला अभिमान वाटतो आहे. त्यांना माझा कमांडर-इन-चीफ बनवण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेल.'

डेमोक्रेटिक पार्टीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी ही कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे. ज्यामध्ये हाऊस स्पीकर नैंनी पेलोसी आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, बराक ओबामा यांचा देखील समावेश आहे. या नेत्यांनी कमला हॅरिस या एक मजबूत आणि चांगल्या अमेदवार असल्याचं म्हटलं आहे.

कॅलिफोर्नियाच्या खासदार असलेल्या कमला हॅरिस या आधी जोए बिडेन यांच्यासोबत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला आहे. त्यांच्या आईचा जन्म भारतात झाला होता तर वडील जमैकन आहेत.