जपानच्या रॉकेटचे प्रक्षेपण सुरु असताना क्षणात कोसळले

जपानमध्ये अंतराळात झेप घेत असताना काही क्षणात या रॉकेटचा स्फोट झाला आणि ते नष्ट झाले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 1, 2018, 03:46 PM IST
जपानच्या रॉकेटचे प्रक्षेपण सुरु असताना क्षणात कोसळले title=
छाया : @Nextlaunch, twitter

टोकियो : जपानमधील एका खासगी कंपनीने विकसित केलेले रॉकेट अवकाशात सोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. दुसऱ्यावेळी हा प्रयत्न केला. मात्र, तोही अयशस्वी झाला. अंतराळात झेप घेत असताना काही क्षणात या रॉकेटचा स्फोट झाला आणि ते नष्ट झाले. खासगी कंपनीच्या मदतीने अंतराळामध्ये 'मोमो-2' हे रॉकेट सोडण्याचा हा प्रयत्न त्यामुळे अपयशी ठरला आहे. 

इंटरनेटसेवा पुरवणाऱ्या 'इंटरस्टेलर टेक्‍नोलॉजीस' या कंपनीने हे मानवविरहीत रॉकेट विकसित केले होते. हाक्काइदो राज्याच्या दक्षिणेकडील तैकी येथून पहाटे ५.३० वाजता या रॉकेटने अवकाशात झेप घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच वेळात रॉकेटने पेट घेतला आणि काही सेकंदातच ते कोसळले आणि स्फोट होऊन ते नष्ट झाले. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. 

या रॉकेटच्या माध्यमातून अंतराळ संशोधनाची उपकरणे १०० किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचवण्यात येणार होती. यापूर्वी गतवर्षी जुलै २०१७ मध्ये सोडण्यात आलेल्या रॉकेटचा संपर्क प्रक्षेपणानंतर काही मिनिटांमध्येच तुटला होता. काल पुन्हा एकदा अपयश आले. दरम्यान, प्रक्षेपणानंतरही रॉकेट विकासाचा कार्यक्रम सुरूच ठेवला जाईल, असे 'इंटरस्टेलर टेक्‍नोलॉजीस कंपनीने म्हटले आहे.