एक मिनिट उशीर झाल्यानं कापला पगार...व्यक्तीनं बॉस विरोधातच उचललं धक्कादायक पाऊल

एक मिनिटं उशीर...कंपनीकडे 14 लाखाचा नुकसान भरपाईचा दावा, नेमकं प्रकरण काय?  

Updated: Nov 11, 2021, 10:41 PM IST
एक मिनिट उशीर झाल्यानं कापला पगार...व्यक्तीनं बॉस विरोधातच उचललं धक्कादायक पाऊल title=
प्रातिनिधिक फोटो

टोक्यो: एखाद्यावेळी काही कारणांनी उशीर होणं ही खूप साधी गोष्ट मानली जाते. मात्र प्रवासात वेळेला खूप महत्त्व आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी गाड्या वेळेत येत नाहीत. ट्रॅफिक तर कधी बिघाड तर कधी खड्डे एक ना अनेक समस्या असतात. ट्रेन एक मिनिटं उशिरा आली म्हणून चक्क कर्मचाऱ्याचा 36 रुपये पगार कापण्यात आला आहे. तर त्या कर्मचाऱ्यानं आपल्या बॉस विरोधात कठोर पाऊल उचललं आहे. 

भारतात गाड्यांना उशीर होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. जगात असे अनेक देश आहेत जिथे गाड्या त्यांच्या वेळेतच धावतात आणि जपान या बाबतीत आघाडीवर आहे. जपानमध्ये गाड्या एक मिनिटही उशिरा येत नाहीत आणि असं झालं तर खूप मोठा गोंधळ होतं.

असाच एक प्रकार जपानमध्ये समोर आला. ड्रायव्हरच्या चुकीमुळे ट्रेनला एक मिनिट उशीर झाला आणि त्यानंतर रेल्वेने चालकाच्या पगारातून 56 येन म्हणजेच सुमारे 36 रुपये कापण्याचा आदेश दिला. पगारातून दंड कापल्याने ट्रेन चालक दाद मागण्यासाठी थेट न्यायालयात गेला आहे. कोर्टात या कर्मचाऱ्याने 14.37 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

 ट्रेन चालकाने आपला छळ केल्या प्रकरणी, आपली प्रतीमा डागाळल्या प्रकरणी आणि आपल्याला नोकरीत आलेल्या समस्यांची एकूण नुकसान भरपाई द्यावी असं कोर्टाकडे सांगितलं आहे. त्यामुळे आता रेल्वे चांगलीच अडचणीत आली आहे. 

काय संपूर्ण प्रकरण?

गेल्या वर्षी 18 जून रोजी ड्रायव्हर ओकायामा स्टेशनवरून रिकामी ट्रेन घेऊन जाणार होता. मात्र त्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. त्यामुळे तो ट्रेनची जबाबदारी आपल्या ज्युनिअरवर सोपवून बाथरूममध्ये गेला. ज्युनियर सहकाऱ्याने ट्रेन चुकीच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन नेली आणि त्यामुळे ट्रेनला एक मिनिट उशीर झाला. यानंतर पश्चिम जपान रेल्वे कंपनीने कारवाई करत चालकाच्या पगारातून 85 येन म्हणजेच सुमारे 55.57 रुपये कापण्याचे आदेश दिला.

जपान रेल्वेच्या निर्णयाविरोधात चालकाने ओकायामा लेबर स्टँडर्ड इन्स्पेक्शन ऑफिस गाठले आणि दंड काढून नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र, रेल्वेने कपातीचे समर्थन करत या काळात कोणतेही काम झाले नसल्याचे सांगितले. कंपनीने दंड 56 येन किंवा सुमारे 36 रुपये कमी केला. 

ड्रायव्हर ओकायामा जिल्हा न्यायालयात पोहोचला आणि त्याने युक्तिवाद केला की ट्रेन उशिरा आल्याने त्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाला नाही, कारण त्यावेळी ट्रेन रिकामी होती. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. या ड्रायव्हरने नुकसान भरपाई म्हणून 14 लाख रुपये रेल्वेने द्यावेत अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी नवीन काय वळण घेतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.