हा चमत्कारच म्हणावा! अपघातात डोकं धडापासून वेगळं, डॉक्टर देवासारखे धावून आले अन्...

Israeli Doctors Reattach Boys Head: डॉक्टरांनी किचकट आणि दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 12 वर्षांच्या मुलाचा जीव त्यांनी वाचवला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 14, 2023, 05:14 PM IST
हा चमत्कारच म्हणावा! अपघातात डोकं धडापासून वेगळं, डॉक्टर देवासारखे धावून आले अन्...  title=
Israeli Doctors Reattach Boys Head After He Was Hit By A Car

Israeli Doctors Reattach Boys Head: डॉक्टर (Doctor) हे देवाचे दुसरे रुप असतं असं बोलतात. अनेकदा डॉक्टर त्यांच्या कौशल्यामुळं मरणाच्या दारातूनही रुग्णाचा जीव वाचवतात. असाच एक चमत्कार इस्त्राइलमध्ये (Israeli) घडला आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळं एका 12 वर्षांच्या मुलाचा पुर्नजन्म झाला आहे. मुलाच्या अपघातानंतर (Accident) डॉक्टरांची किचकट शस्त्रक्रिया करत मुलाचे प्राण वाचवले आहेत. त्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

द टाइम्स ऑफ इजराइलने दिलेल्या वृत्तानुसार, सुलेमान हसन नावाच्या 12 वर्षांच्या मुलाचा अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याचे शिर धडापासून वेगळे झाले होते. सुलेमान सायकल चालवत असताना एका कारने त्याला धडक दिली. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. मुलाची गंभीर अवस्था पाहून हवाईमार्गे त्याला हादसाह मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला आपातकालीन शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या अपघातानंतर त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. मुलाच्या हाडांच्या कवटीच्या मागील बाजूस असलेल्या लिगामेंट्सना गंभीर नुकसान पोहोचले होते. त्यामुळं त्याच्या मणक्याच्या वर असलेल्या हाडांपासून डोके वेगळे झाले. वैज्ञानिक भाषेत या स्थितीला  orthopedic decapitation असं म्हणतात. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. ओहद इनाव यांनी म्हटलं आहे की, मुलाचा जीव आम्ही वाचवू शकतो की नाही याबाबत आम्हाला तसूभरही खात्री नव्हती. मात्र आम्ही हार मानली नाही. कित्येक तासांनंतर आम्ही शस्त्रक्रिया यशस्वी करुन दाखवली. मुलाचा जीव वाचल्यानंतर डॉक्टरांची संपूर्ण टीम आनंदित आहे. 

रिपोर्टनुसार, मागील महिन्यात म्हणजे जूनमध्ये ही घटना घडली आहे. मात्र, जुलैपर्यंत या घटनेबाबत डॉक्टरांनी कोणालाही सांगितलं नव्हता. कारण तो बरा होणं हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते. कारण तो या अपघातातून वाचेल याची शक्यता कमी होती. मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी या घटनेची माहिती सर्वांना दिली. दरम्यान, मुलाला रुग्णालयातून सुट्टी जरी मिळाली असली तरी डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे. 

मुलाचा जीव वाचल्यानंतर त्याच्या वडिलांनी डॉक्टरांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद दिले आहेत. अत्यंत किचकट आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सुलेमान हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.