...तर गाझा इस्रायल लष्कराची स्मशानभूमी ठरेल; इराणकडून 'आर या पार'चा इशारा

Israel Hamas War Iran Warning: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने या वादात उडी घेत पॅलेस्टाइनची बाजू घेतली आहे. पॅलेस्टाइनसंदर्भात इराणने एक इशाराच जारी केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 16, 2023, 07:54 AM IST
...तर गाझा इस्रायल लष्कराची स्मशानभूमी ठरेल; इराणकडून 'आर या पार'चा इशारा title=
इस्रायलने गाझा पट्टीमध्ये शिरण्यासाठी तयारी केल्यानंतर इशारा

Israel Hamas War Iran Warning: इस्रायल आणि हमास दरम्यान सुरु असलेल्या युद्ध दुसऱ्या आठवड्यातही सुरुच आहे. इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीमध्ये घुसखोरी करण्याची तयारी सुरु केली आहे. गाझा पट्टीतील पॅलेस्टीनी नागरिकांना इशारा देण्याबरोबरच प्रत्यक्ष कारवाईलाही इस्रायलने हळूहळू सुरुवात केली आहे. आम्ही गाझा पट्टीवर हल्ला करणार असून लोकांनी दक्षिण गाझातील प्रांतांमध्ये स्थलांतरित व्हावं असं म्हटलं आहे. असं असतानाच इराणने इस्रायलला धमकी दिली आहे. इस्रायलचं लष्कर खरोखरच गाझामध्ये शिरलं तर नवीन पेच निर्माण होईल. या भागातील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र इस्रायलचा हा निर्णय फारच धोकादायक ठरु शकतो असा इशारा इराणने दिला आहे.  इस्रायलच्या लष्करासाठी गाझा पट्टी स्मशानभूमी ठरु शकते असं इराणने म्हटलं आहे. गाझामध्ये 2670 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इस्रायलमधील 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

हल्ले वेळीच थांबले नाहीत तर...

इराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांनी रविवारी अल जजीराला दिलेल्या मुलाखतीत इस्रायलला इशारा दिला आहे. गाझा पट्टीमधील मुलांना लक्ष्य करणाऱ्या इस्रायलने हे हल्ले वेळीच थांबले नाहीत तर युद्ध अनेक अर्थांनी वेगळ्या मार्गावर जाईल अशी दाट शक्यता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

हमासच्या हल्ल्यात इराणचा हात?

जर इस्रायलमधील यहूदी शक्ती गाझामध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार असतील तर हमास असं उत्तर देईल की गाझा पट्टी इस्रायलच्या सेनेची स्मशानभूमी म्हणून ओळखली जाईल. इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचा हात असल्याचा दावाही तेहरानने फेटाळला आहे. मात्र आपलं समर्थन पॅलेस्टाइनला असल्याचंही इराणने अनेकदा स्पष्ट केलं आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनीही केलं आवाहन

हमासने एका पत्रकाच्या माध्यमातून अमीर-अब्दुल्लाहियन यांनी शनिवारी कतारमध्ये हमासचे नेते इस्माइल हानियेह यांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलं. गाझामधील संकटासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आणि इराण पॅलेस्टाइनला समर्थन करेल अशी ग्वाही इराणकडून देण्यात आली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी शनिवारी सर्व मुस्लीम देशांना आवाहन करताना, पॅलेस्टाइनच्या मदतीसाठी पुढे येणं हे प्रत्येक मुस्लीम देशाचं कर्तव्य आहे असं खामेनेई यांनी म्हटलं आहे.

आम्हाला युद्ध नको पण...

हिजबुल्लाहच्या हल्ल्यांसंदर्भात इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी, युद्धाची आम्हाला कोणतीही हौस नाही. ज्या सीमा निश्चित केल्या आहेत त्या कायम असाव्यात इशीच आमची इच्छा आहे. देशाच्या उत्तरेला युद्ध करण्याची आमची कोणतीही इच्छा नाही. जर हिजबुल्लाहने युद्धाचा मार्ग निवडला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. ही किंमत विचार करता येणार नाही एवढी मोठी असेल. त्यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवलं तर आम्ही त्यांचा सन्मान करु आणि परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा प्रयत्न करु, असं इस्रायलने म्हटलं आहे.