वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारच्या आयत कराबाबतच्या धोरणावर टीका केली आहे. भारतानं हार्ले डेविडसनसारख्या आयात होणाऱ्या बाईकवरचा आयात कर घटवून ५० टक्के केला आहे. पण हा निर्णय घेऊन भारतानं अमेरिकेवर उपकार केले नाहीत, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.
याआधी भारतात आयात होणाऱ्या ८०० सीसी इंजिन क्षमता असलेल्या बाईकसाठी ६० टक्के आयात कर तर ८०० सीसीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या बाईकवर ७५ टक्के आयात कर लावण्यात येत होता.
आयात कर आम्ही ५० टक्के केला असल्याचं मोदींनी मला सांगितलं पण याचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही, असं मी मोदींना म्हणालो, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. आयात कर ५० टक्के केल्यानंतर आपलं काम झाल्याचं भारताला वाटत आहे. कर कमी करून त्यांनी आमच्यावर उपकार केले आहेत, असं त्यांना वाटतंय पण हे उपकार नाहीत, असं ट्रम्प म्हणाले.
भारतातल्या बाईक जेव्हा अमेरिकेत येतात तेव्हा आम्ही जवळपास शून्य टक्के आयात कर लावतो पण भारताकडून ५० टक्के आयात कर लावला जातो, यामध्ये अमेरिकेचा काय फायदा, असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला. अमेरिकेच्या राज्यपालांना संबोधित करताना ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शानदार व्यक्ती असल्याचंही ट्रम्प म्हणाले.