मुंबई : कोरोना रुग्णांनी जगात नवा विक्रम नोंदविला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जगभरात 2 लाख 30 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले की, कोरोनाबाधित देशांमध्ये अमेरिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या चोवीस तासात येथे 66 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत.
डब्ल्यूएचओच्या आकडेवारीमध्ये कोरोना इन्फेक्शनच्या अहवालात होणाऱ्या विलंबामुळे काही रुग्णांचा या आकडेवारीत समावेश नाही. असा अंदाज आहे की नोंदविलेल्या डेटापेक्षा वास्तविक डेटा अधिक असू शकतो.
कोरोना संसर्गावरील ताज्या आकडेवारीवरून असे सूचित होते की, जगात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी जगभरात 2.28 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, कोविड रुग्णांची संख्या जगभरात 1.27 कोटींवर पोहोचली आहे. तर मृत्यूची संख्या 5 लाख 64 हजारांपेक्षा अधिक आहे.
विद्यापीठाने ताज्या अहवालात म्हटले आहे की, रविवारी पहाटेपर्यंत एकूण 1,26,81,472 प्रकरणांची नोंद झाली आहे, तर मृत्यूची संख्या वाढून 5,64,420 झाली आहे.
कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत भारतातील 8 लाख 49 हजार 553 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 लाख 34 हजार 621 लोक बरे झाले आहेत. कोरोनामुळे भारतात 22 हजार 674 जणांचा मृत्यू झाला आहे.