लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्यावेळी जून महिन्यात पावसाने झोडपून काढलेल्या ब्रिटनमध्ये आता चक्क उन्हाचे चटके बसत आहेत. युरोपात मात्र उष्णतेच्या लाटेमुळे लोकांच्या जिवाची काहिली झाली आहे. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कडक उन्हाळा आहे. तिथल्या तापमानाचा पारा तिशीपार गेला आहे.
एरव्ही थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या युरोप खंडातील लोकांच्या जिवाची सध्या काहिली झाली आहे. युरोपातल्या इंग्लड, फ्रान्स या देशांमध्ये तापमानाचा पारा तिशीच्या पलिकडं गेलाय. एरव्ही युरोपातल्या लोकांना एवढ्या तापमानाची सवय नाही. फ्रान्समधील काही रस्त्यांवर लोकांच्या अंगावर थंड हवेचे झोत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढते ऊन पाहून काही लोकांनी वॉटरपार्कची वाट धरली आहे.
इंग्लंडमध्येही काही वेगळी स्थिती नाही. तापमान वाढल्यानंतर नदीत डुंबण्यासाठी इंग्लिश नागरिकांनी नदीवर अक्षरक्षः रांगा लावल्यात. काही जण नदीकिनाऱ्यावरील झाडांच्या सावलीत आरामशीर पडलेले दिसतायत. नदीत बोटिंगसाठीही मोठी गर्दी झाली आहे. बाहेर खूप उकाडा आहे. आम्हाला थंड पाण्यात पोहोण्याची इच्छा झाली. आम्ही इथे रांगेत उभं राहिलो तेव्हा प्रचंड उकाडा होता. पण नदीवर आलो आणि वातावरणच बदलले, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली.
जागतिक तापमानवाढीमुळे बदलेल्या वातावरणाबाबत मी चिंतीत आहे. प्रत्येकाने तापमानवाढ रोखण्यासाठी काम केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलेने व्यक्त केली. तर आईसक्रिमच्या गाड्यांसमोर गर्दी दिसत आहे. तर बिअरच्या मागणीतही वाढ झाली आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांनी कार्यालयांना दांडी मारून घरीच राहणं पसंत केले आहे. तर या भागातल्या अनेक शाळांना सुट्ट्याही देण्यात आल्यात. २००३मध्ये फ्रान्समध्ये उष्णतेची लाट आली होती. त्यावेळी ४४ अंशापर्यंत पारा गेला होता. यंदा तो विक्रम मोडण्याची शक्यता आहे.