काश्मीर मुद्यावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको, मोदींच्या भेटीनंतर फ्रान्सकडून भारताचं समर्थन

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दहशतवाद विरोधात आपण भारतासोबत उभं असल्याची ग्वाही दिलीय

Updated: Aug 23, 2019, 10:19 AM IST
काश्मीर मुद्यावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको, मोदींच्या भेटीनंतर फ्रान्सकडून भारताचं समर्थन title=

नवी दिल्ली : जी-७ संमेलनासाठी फ्रान्समध्ये दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यादरम्यान द्विपक्षीय बैठक पार पडली. या दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी जम्मू-काश्मीर विषयावरही भाष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून मोदी सरकारनं अनुच्छेद ३७० हटवण्याचं समर्थन केलंय. 'काश्मीर मुद्यावर कोणत्याही तिसऱ्या देशानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही. हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा आहे' असंही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय. काश्मीर हा मुद्द्यावर सर्वस्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेतूनच तोडगा निघू शकतो असं मॅक्रॉन म्हणाले. काश्मीरबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने मध्यस्थीची बडबड करत आहेत. त्यावर मॅक्रॉन यांची भूमिका लक्षणीय आहे. पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात काल अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर संयुक्त निवेदनात मॅक्रॉन यांनी काश्मीरमध्ये शांतता नांदावी अशी फ्रान्सची इच्छा असल्याचं म्हटलंय. पण काश्मीरप्रश्नी केवळ भारत आणि पाकिस्तान यांनीच चर्चेतून तोडगा काढावा असं ते म्हणाले. काश्मीरबाबत तणाव निवळण्यास पावलं उचला असं आपण इम्रान खान यांनाही सांगू असं मॅक्रॉन म्हणाले. 

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दहशतवाद विरोधात आपण भारतासोबत उभं असल्याची ग्वाही दिलीय. 'दहशतवादाविरोधी लढाईत फ्रान्स नेहमीच भारतासोबत उभा राहिलाय. भारत आणि फ्रान्स प्रत्येक परिस्थितीत सोबत राहिलेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत डिजिटल, सायबर सिक्युरिटी तसंच आफ्रीका यांसारख्या मुद्यांवर चर्चा केली. या सर्व मुद्यांवर सोबत काम करू, असंही त्यांनी म्हटलंय.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी घडलेल्या पुलवामा हल्ल्याप्रती मॅक्रॉ़न यांनी संवेदना व्यक्त केल्या. सुरक्षा क्षेत्रासंबंधी दोन्ही देशांत जे सामंजस्य आहे ते पाहून आमचा एकमेकांप्रती विश्वास स्पष्ट होतो, असंही त्यांनी म्हटलंय.