नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एका माशाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वच जण हैराण होत आहेत. या व्हिडिओमध्ये एक मासा दिसतोय, ज्याच तोंड अगदी माणसाच्या तोंडासारखं दिसतंय. इंटरनेटवर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. हा मासा चीनमधील एका गावांतील नदीत दिसला असल्याचं बोललं जात आहे. माशाचा चेहरा माणसाच्या चेहऱ्यासारखा कसा काय दिसतोय? याच संभ्रमात अनेक जण पडले आहेत.
केवळ १४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मासा नदीतून पोहत किनाऱ्यालगत येतोय. किनाऱ्यावर तो काहीतरी खाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. माशाचं नाक, डोळे आणि माणसाप्रमाणे असणारं तोंडही व्हिडिओमधून दिसतंय.
This carp has a human face pic.twitter.com/okT67Zyo4v
— The Unexplained (@Unexplained) November 8, 2019
'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ एका महिलेने रेकॉर्ड केला आहे. चीनमधील मियाओ गावांतील एका नदीत हा मासा दिसल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ चीनी मायक्रोब्लॉगिंग साइट वीबोवर पाहण्यात आला. त्यानंतर मात्र इतर सोशल मीडिया साइट्सवर हा व्हिडिओ अनेकांकडून शेअर करण्यात येत आहे.
या व्हिडिओबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, माणसासारख्या दिसणाऱ्या या माशाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.