Famous Singer Dies By Shock: आतापर्यंत तुम्ही स्टेजवर हार्ट अटॅक आल्याने किंवा काही अपघाताने सेलिब्रिटींचा मृत्यू झाल्याचं ऐकलं, वाचलं असेल. मात्र एका विचित्र घटनेमध्ये चाहत्याच्या अतिउत्साहामुळे प्रसिद्ध गायकाबरोबर त्याचा चाहताही मरण पावल्याची दुर्देवी घटनेनं मनोरंजनसृष्टी हादरून गेली आहे. ही घटना घडली आहे ब्राझीलमध्ये. या दुर्घटनेत ब्राझीलमधील प्रसिद्ध गायक आयरेस सासाकी (Ayres Sasaki) स्टेजवर मरण पावला.
35 वर्षीय आयरेस सासाकी हा सॅलिनोपोलिस येथील सोलार हॉटेलमधील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. या कॉन्सर्टमध्ये आयरेस स्टेजवर असतानाच त्याला एका ओल्या चिंब झालेल्या चाहत्याने मिठी मारली. त्याचवेळी गिटारसाठी लावलेल्या वायरमधून विद्युतप्रवाहचा झटका या दोघांना बसला. या दोघांचा जागीच मृत्यू झाला. आयरेस सासाकीचं जवळपास वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं.
'द मीरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, आयरेसची चुलती रिटा माटोस या सुद्धा अपघात झाला त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना रिटा यांनी, "त्याचा कार्यक्रम ठराविक वेळेसाठी ठरलेला होता. मात्र हा वेल वाढला. आता आम्ही त्याच्यासोबत असलेल्या लोकांकडूनच नेमकं काय घडलं हे समजून घेत आहोत. आम्ही सर्व माहिती घेऊनच एक पत्रक जारी करणार असून ते प्रसारमाध्यमांना देणार आहोत," अशी माहिती दिली. आयरेसला मिठी मारणारा चाहता भिजून का आला होता? यामागील उत्तर अद्याप सापडलेलं नाही. सॅलिनोपोलिस पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र भिजून आलेल्या चाहत्यामुळे प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.
ज्या हॉटेलमध्ये आयरेसचा मृत्यू झाला त्या हॉटेलने जारी केलेल्या पत्रकामध्ये, "आम्ही त्याच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला असून आवश्यक त्या सर्व गोष्टी आम्ही करत आहोत. आम्ही या प्रकरणाच्या तपासासंदर्भात यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत असून हवी ती माहिती देत आहोत," असं सोलार हॉटेलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीचा व्हिडीओ स्वत: या गायकानेच पोस्ट केला होता. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
आयरेसची पत्नी मारिनाने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये, "मला मेसेज केलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानते. तुम्ही दाखवलेलं प्रेम आणि सहानुभूतीसाठी मी आभारी आहे. आमच्या या कठीण काळात आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचे आभार मानतो. अजूनही सर्व मेसेज वाचलेले नाहीत. मात्र परिस्थिती सुधारेल तशी मी सर्वांना रिप्लाय करेल. पाठिंब्यासाठी आभारी आहे," असं म्हटलं आहे.