Srilanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणीनंतर हवेत गोळीबार, राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पळ काढल्यानंतर परिस्थिती अनियंत्रित

राष्ट्रपतींच्या पलायनानंतर श्रीलंकेत आता पंतप्रधान आंदोलकांच्या निशाण्यावर, घर आणि कार्यालयाला घेराव  

Updated: Jul 13, 2022, 02:21 PM IST
Srilanka Crisis :  श्रीलंकेत आणीबाणीनंतर हवेत गोळीबार, राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पळ काढल्यानंतर  परिस्थिती अनियंत्रित title=

Srilanka Crisis :  श्रीलंकेतील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देशातून पळ काढल्यानंतर परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून आंदोलकांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांनी पलायन केल्यानंतर श्रीलंकेत हिंसक निदर्शनं होत आहेत. पोलिस जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर करत आहेत.

पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्याकडे काळजीवाहू राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर जात आहे. लोक विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत. विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. तसंच प्रश्चिम प्रांतात कर्फ्यू लागू केला आहे,

रानिल विक्रमसिंघे यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रचंड हिंसाचार होत आहे. विरोधकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासोबत संसदेतही धडक दिली आहे. बुधवारी पहाटे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या पलायनामुळे पुन्हा एकदा हिंसाचार पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या कार्यालयाला चारही बाजूंनी आंदोलकांनी घेराव घातला आहे. मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराचे नळकांडे सोडावे लागले. काही आंदोलक भिंत ओलांडून आतही घुसले आहेत. याशिवाय संसद भवनाबाहेरही आंदोलकांचा जमाव आहे. या भागावर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे नजर ठेवली जात आहे.