नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मार्शल लॉबाबत स्वाक्षरी केली असून त्यामुळे आता युक्रेनमध्ये परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. नुकतेच झालेले हल्ले पाहता भारतीय दूतावासाने एक पत्रक जारी केलं आहे. बुधवारी भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाने युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे.
बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या चार भागात मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली. लुहान्स्क, डोनेस्तक, झापोरिझ्झ्या आणि खेरसन या भागात हा कायदा लागू होणार आहे. जे बेकायदेशीरपणे रशियाच्या ताब्यात होते. मार्शल लॉच्या घोषणेनंतर, रशियाच्या सर्व प्रदेशांच्या प्रमुखांना अतिरिक्त आपत्कालीन अधिकार मिळाले आहेत.
व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले की, मी रशियन फेडरेशनच्या या चार भागांमध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या हुकुमावर स्वाक्षरी केली आहे. गुरुवारपासून प्रदेशांमध्ये मार्शल लॉ लागू केला जाईल.
अलीकडे रशियाकडूनही युक्रेनवर हल्ले वाढले आहेत. सोमवारी (17 ऑक्टोबर) युक्रेनच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. युक्रेनच्या वतीने ड्रोन हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याआधी 10 ऑक्टोबर रोजी रशियाकडून युक्रेनमध्ये सुमारे 84 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला होता.