Earthqauke in Mexico-Guatemala: मेक्सिको आणि ग्वाटेमाला सीमेवर रविवारी अतिप्रचंड भूकंपामुळं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. साधारण 6.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या भूकंपामुळं या भागात राहणाऱ्या असंख्य नागरिकांनी मोकळ्या जागेत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळ काढला. यावेळी घटनास्थळी एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार रविवारी 12 मे रोजी हा भूकंप आला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेचा हवाला देत रॉयटर्सनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भूपृष्ठापासून जवळपास 47 मैल अर्थात 75 किमी खोलवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामध्ये जीवित आणि वित्ताची मोठी हानी झालेली नाही. असं असलं तरीही ग्वाटेमालाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मात्र नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. क्वेटजाल्टेनँगो (Quetzaltenango) आणि सॅन मार्कोस या भागांमध्ये असणाऱ्या काही इमारतींचं या भूकंपात नुकसान झाल असून काही भागांमध्ये भूस्खलनही झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
मेक्सिको आणि ग्वाटेमाला इथं आलेल्या या भूकंपानंतर अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणाली आणि मेक्सिकोच्या नौदलाकडून इथं तूर्तास त्सुनामीची भीती नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. एपी, वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं.