चोराने कार चोरल्यानंतर त्यांना अटक केल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, पोलिसांनी चार गाढवांना महागडी कार चोरी करताना रंगेहाथ पकडल्याचं समोर आलं आहे.
दक्षिण आफ्रिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी पोलिसांनी चक्क चार गाढवांना महागडी कार चोरी करत असताना पकडलं आहे. इतकचं नाही तर ही गाढवं नदी पार करुन महागडी कार झिम्बाब्वेमध्ये नेत होते. मात्र, त्यांना पोलिसांनी पकडलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांच्या मते, पोलीस कारवाई करत असल्याचं पाहून संशयित चोरांनी कार आणि गाढवांना सोडून तेथून पळ काढला.
अशा प्रकारची ही काही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही डिसेंबर महिन्यात डरबन शहरातून चोरी झालेली कार नदीत आढळली होती. या कारलाही गाढवांच्या मदतीने नदीच्या पलिकडे नेलं जात होतं. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून अद्याप या चोरांच्या टोळीचा पत्ता लागलेला नाहीये.
पोलीस अधिका-यांनी सांगितले की, मर्सडीज बेंज सी-२२० कार लंपोपो नदीतून जप्त करण्यात आली आहे. चोरांची टोळी नदीतून कार बाहेर काढण्यासाठी गाढवांचा वापर करते. मात्र, त्याच दरम्यान पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि चोरांचा प्लॅन फसला.
असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, अत्याधुनिक वाहनांत वापरण्यात येणा-या ट्रॅकिंग उपकरणांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे गाडी स्टार्ट झाल्यास सॅटेलाइटच्या सहाय्याने कारचं लोकेशन ट्रॅक करता येऊ शकतं. यापासून वाचण्यासाठी चोर गाढवांची मदत घेतात.