Trump Hide Information About The Gifts: अमेरिकेतील डेमोक्रॅटिक काँग्रेसच्या समितीने जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ट्रम्प यांना परदेशातील नेत्यांकडून मिळालेल्या 2.5 लाख अमेरिकी डॉलर्स (भारतीय चलनानुसार 2 कोटी 6 लाख रुपये) भेटवस्तूंची माहिती सरकारला दिली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. डेमोक्रॅटिक काँग्रेस अहवालानुसार, या भेटवस्तूंमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासहीत अनेक भारतीय नेत्यांनी दिलेल्या 47 हजार डॉलर्सच्या (38 लाख 85 हजार रुपये) भेटवस्तुंचाही समावेश आहे. 'सौदी तलवारी, भारतीय आभूषणे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं एक मोठं साल्वाडोरन पोट्रेट: प्रमुख परदेशी भेटवस्तूंबद्दल माहिती देण्यात ट्रम्प प्रशासनाला आलेले अपयश' या मथळ्याखाली हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
परदेशी भेटवस्तू आणि सजावटीसंदर्भातील नियमानुसार, पदावर असताना परदेशी सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती देण्यामध्ये ट्रम्प अपयशी ठरले आहेत. याच प्रकरणामधील चौकशी समितीने त्यांचा हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते असून ते 2017 ते 2021 दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर होते. ते अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष होते.
या अहवालामध्ये ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाने 100 हून अधिक परदेशी भेट वस्तूंची माहिती दिलेली नाही. या भेटवस्तूंची किंमत एक मिलियन डॉलर्सहून अधिक (8.26 कोटी रुपयांहून अधिक) आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या महानिरीक्षक कार्यालयाने ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात प्रोटोकॉल प्रमुखांच्या कार्यालयाकडून महत्त्वाच्या समस्यांसंदर्भातील एक अहवाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मौल्यवान सामानाचाही उल्लेख आहे.
अहवालानुसार, ट्रम्प यांच्या कुटुंबियांना 47 हजार अमेरिकी डॉलर्सहून (38 लाख 85 हजार रुपये) अधिक रुपये किंमत असणाऱ्या 17 भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. या भेटवस्तूंची माहिती ट्रम्प यांनी संबंधित विभागांना दिलेली नाही. यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी दिलेलं 8500 अमेरिकी डॉलर्स (7 लाख रुपये) किंमतीचा फ्लॉवरपॉट, 4600 डॉलर्स (3.80 लाख रुपये) किंमतीची ताजमहालची प्रतिकृतीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिलेला 6600 डॉलर्स (5.45 लाख रुपये) किंमतीचा गालीचा आणि पंतप्रधान मोदींनी दिलेल्या 1900 डॉलर्स (1.57 लाख रुपये) भेटवस्तूचा समावेश आहे.