Dhaka Blast : बांग्लादेशची (Bangladesh) राजधानी ढाकामध्ये झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. (Dhaka Blast News) या स्फोटात 100 हून अधिक लोक जखमी झालेत. ढाकामधील गुलिस्तान परिसरातील एका सात मजली इमारतीत स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. आग भडकल्याने त्यामध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू झाला. तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाची 11 पथकं दाखल झाली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने मोठी जीवितहानी झाली. हा स्फोट कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. स्फोटात रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट काल संध्याकाळी 4.50 च्या सुमारास झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. त्याआधी आगीचा मोठा भडका उडला. यात 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, 100 हून अधिक लोक त्यात जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. स्फोट इतका तीव्र होता की घटनास्थळी बराच वेळ धूर दिसत होता. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आतापर्यंत सोळा हाती मृतदेह सापडले आहेत, परंतु बचाव कार्य सुरु असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, असे अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यानी सांगितले.तर एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या 17 वर गेली.
जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ज्या इमारतीत स्फोट झाला, त्या इमारतीच्या तळमजल्यावर सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत आणि त्याच्या शेजारी BRAC बँकेची शाखा आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यात येथील बसस्थानकाचेही मोठे नुकसान झाले. पोलिसांनी सांगितले की, 45 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. उर्वरित जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्फोटाबाबत प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आवाजानंतर लोक तातडीने इमारतीतून बाहेर आले. सर्वांच्या चेहऱ्यावर भितीची वातावरण होते. कोणाला काय झाले ते समजत नव्हते. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्या. अनेक पादचारी रस्त्यावर खाली कोसळलेत. रस्त्यावर पडून काही लोक जखमी झालेत. स्फोटानंतर बॉम्ब निकामी युनिटने इमारतींची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.