Covid 19 रुग्णांची संख्या 50 कोटींवर, जगासाठी धोक्याची घंटा

10 देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने दार ठोठावले आहे.

Updated: Apr 12, 2022, 04:39 PM IST
Covid 19 रुग्णांची संख्या 50 कोटींवर, जगासाठी धोक्याची घंटा title=

Covid 19 : जगातील देशांसाठी चिंतेची बातमी आहे. सोमवारी जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 50 कोटींच्या पुढे गेली आहे. या 50 कोटी रूग्णांची (Corona patients) नोंद फक्त 877 दिवसात झाली आहे. यापैकी 44 कोटी 88 लाख लोकं बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. पण त्यासोबत एक दु:खद बातमीही आहे. संसर्गामुळे आतापर्यंत जगभरात 62 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे आकडे worldometers.info/coronavirus ने जाहीर केले आहेत.

17 नोव्हेंबर 2019: चीनच्या वुहान शहरात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला होता. बाकी जगाला त्याची जाणीवच नव्हती. खुद्द चीननेही याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. मात्र, वर्षअखेरीस अमेरिकेसह अनेक देशांना याची माहिती मिळाली.
31 डिसेंबर 2019: वुहानमध्ये अनेक लोकांना एकत्रितपणे संसर्ग झाल्याचे आढळले.
01 जानेवारी 2020: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तातडीची बैठक बोलावली. यामध्ये सर्व देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
04 जानेवारी 2020: WHO ने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला कोरोना बद्दल सांगितले.
12 जानेवारी 2020: चीनने कोरोनाव्हायरसचा अनुवांशिक क्रम सार्वजनिकपणे उघड केला.
13 जानेवारी 2020: चीनच्या बाहेर थायलंडमध्ये पहिला रुग्ण सापडला.
14 जानेवारी 2020: डब्ल्यूएचओने संपूर्ण जगाला सांगितले की हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. त्याची लक्षणे व प्रतिबंध करण्याच्या पद्धतींची माहिती देण्यात आली.
30 जानेवारी 2020: भारतातील केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला.
30 जानेवारी 2020: WHO ने आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली.
11 मार्च 2020: WHO ने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केले.

17 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण (Corona first patient) आढळला होता. यानंतर, पुढील 222 दिवसांत म्हणजेच 25 जून 2020 पर्यंत जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 10 दशलक्षांवर पोहोचली. एक ते 10 कोटी रूग्ण होण्यासाठी फक्त 214 दिवस लागले. यानंतर, संसर्गाचा वेग इतका वाढला की अवघ्या 190 दिवसांत जगभरातील रुग्णांची संख्या 200 दशलक्षांवर पोहोचली.

20 ते 30 कोटी संक्रमित होण्यासाठी 155 दिवस लागले. यानंतर संसर्गाने इतका कहर केला की अवघ्या 34 दिवसांत 100 दशलक्ष नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या 40 कोटींवर पोहोचली आहे. आता 40 कोटींचा हा आकडा 62 दिवसांत 50 कोटींवर पोहोचला आहे.
 
कोरोनाने अमेरिकेवर (Corona in US) सर्वाधिक कहर केला. आतापर्यंत 8.20 कोटी लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे 7.99 कोटी लोक बरे झाले, पण 10 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.

सर्वाधिक संसर्गाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत येथे 4.30 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4.25 कोटी लोक बरे झाले आहेत, तर 5.21 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता भारतात फक्त 11 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

असे 10 देश आहेत जिथे कोरोनाच्या चौथ्या लाटेने दार ठोठावले आहेत. यामध्ये अमेरिका, ब्राझील, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया, इटली, फ्रान्स, जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे.

गेल्या सात दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक 14 लाख रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, येथे 2100 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सात दिवसांत जर्मनीमध्ये दहा लाख आणि फ्रान्समध्ये नऊ लाख लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले.