मुंबई : जगात सध्या कोरोनाच्या (Coronavirus) उद्रेकामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि कडक संचारबंदी कायम आहे. अनेक व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र, लसीकरणानंतरही (Covid Vaccination) कोरोना विषाणू बाधित रुग्णांत वाढ होत आहे. आफ्रिका खंडातील सेशेल्स या (Coronavirus in Seychelles) देशात लसीकरणानंतरही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने पुन्हा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, कोरोना लसीबाबत चिंता वाढली आहे.
जगभरात कोरोनाचे संकट कायम दिसून येत आहे. काही देशांनी कोरोनावर मात करण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे. इस्त्रायल, चीन या देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. येथे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, आजही अनेक देशात कोरोनाची भीती कायम आहे. कोरोनाच्या संकटापासून बचावासाठी सध्या लस हा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधातील लसीकरण वाढवण्यावर भर देत आहेत. (Coronavirus ) मात्र आफ्रिका खंडातील सेशेल्स या देशात लसीकरणानंतरही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने लोक भीतीच्या छायेत आहेत. जगात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक लोकांचे लसीकरण हे सेशेल्समध्येच झाले आहे.
सेशेल्समध्ये लसीकरणानंतरही येथे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. 7 मे पर्यंत या देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण हे दुप्पट झाले आहे. लसीकरणानंतर पुन्हा कोरोनात वाढ झाल्याने जगभरातील तज्ज्ञांची चिंता व्यक्त केली आहे. सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार येथे गेल्या आठवडाभरापासून कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या दुप्पट झाली आहे. तसेच नव्या रुग्णांचा आकडा हा 2486पर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची बाधा झालेल्या लोकांपैकी तब्बल 37 टक्के लोकांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
दरम्यान, सेशेल्समध्ये 57 टक्के लोकांना चीनमध्ये विकसित झालेली सिनोफार्म आणि उर्वरित लोकांना भारतात उत्पादित झालेली कोविशिल्ड ही लस देण्यात आली होती. दरम्यान, भारतामध्येही बहुतांश लोकांन कोविशिल्ड ही लसच टोचली जात आहे. त्यामुळे लस घेऊनही कोरोना रुग्ण वाढ होत असतील तर चिंता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. असे असले तरी एक चागंली बातमी म्हणजे, लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींपैकी कुणाचाही कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेला नाही.
सेशेल्समध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा दक्षिण आफ्रिकेत सापडलेला B 1.351 हा व्हेरिएंट सापडला होता. या व्हेरिएंटवर कोविशिल्ड ही लस अधिक परिणामकारता दाखवू शकलेली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने या लसीच्या वापराला स्थगिती दिली होती.