नवी दिल्ली : संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाने जगभरातील २००हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं आहे. अमेरिकासारखा बलाढ्य देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. भारतातही कोरोनाचे ९ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
संपूर्ण जगभरात आतापर्यंत १,८७४,७०९ हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११६,०७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील ४३५,३३२ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील एकूण २१३ देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.
देशभरात आता कोरोनाबाधितांची संख्या ९३५२ वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ३२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ९०५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत ९८० रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या, इटली दुसऱ्या तर स्पेन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ५६१,८७५ वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसने २२ हजार १६१ नागरिकांचा बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ३३ हजार २६९ रुग्ण या धोकादायक आजारातून सुखरूप बरे झाले आहेत.
इटलीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५६,३६३ वर पोहोचली आहे. या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आता पर्यंत १९ हजार ८९९ रुग्णांचा या धोकादायक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर ३४,२११ रुग्ण बरे झाले आहे.
स्पेनमध्ये देखील कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. या देशात आतापर्यंत १६९,४९६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १७ हजार ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत ६४ हजार ७२७ रुग्णांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाली आहे.