Uber च्या एका ट्रीपचं बिल 24 लाख रुपये! Anniversary साठी परदेशात गेलेल्या जोडप्याला भरली धडकी

Uber Ride Rs 24 Lakh Bill: हे दोघेही आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुसऱ्या देशात गेले होते. त्याचवेळेस त्यांच्याबरोबर हा विचित्र प्रकार घडल्याने त्यांना फारच टेन्शन आलं. या दोघांनाही एका प्रवासाचं एवढं बिल पाहून आश्चर्याचा धक्का बसला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 11, 2023, 01:20 PM IST
Uber च्या एका ट्रीपचं बिल 24 लाख रुपये! Anniversary साठी परदेशात गेलेल्या जोडप्याला भरली धडकी title=
दोघेही त्यांच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त परदेशात गेले होते

Uber Ride Rs 24 Lakh Bill: मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाल देशात सुट्ट्यांसाठी आलेल्या एका ऑस्ट्रेलियन जोडप्याबरोबर फारच विचित्र प्रकार घडला आहे. या देशात एक उबर राइड या जोडप्याला लाखो रुपयांना पडली आहे. खरं तर ही उबर राईड त्यांना 55 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 4 हजार 500 रुपयांमध्ये मिळणार होती. मात्र या उबर राईडचं बिल चक्क 29 हजार 994 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 24 लाखांच्या आसापास आलं. हे बिल पाहून या दोघांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे परदेशात हा प्रकार घडल्याने दोघांनाही पुढे काय करावं कळेना.

नेमकं घडलं काय?

हा गोंधळ कशामुळे झाला यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. उबरच्या बुकींगनुसार या जोडप्याकडून कोस्टा रिकन कोलोन म्हणजेच कोस्टा रिकामधील चलनानुसार पैसे आकारणं अपेक्षित होतं. मात्र चुकून या जोडप्याला थेट अमेरिकी डॉलर्समध्ये बिल दर्शवण्यात आलं.  सर्वात प्रथम हा प्रकार डग्लस ऑर्डोन्झेने आपल्या डेबिट कार्डवरुन या उबर ट्रीपचं बिल भरण्याचा प्रयत्न केला. मात्र खात्यावर पुरेसे पैसे नसल्याचं दर्शवण्यात आलं. त्यावेळी डग्लसने आपल्या खात्यावरील बॅलेन्स तपासून पाहिला. नंतर त्याने बिल पाहिलं असता त्यांना तब्बल 29 हजार अमेरिकी डॉलर्सचं बिल पाठवण्यात आल्याचं उघड झालं.

आर्थिक गणित कोलमडण्याची भीती

डग्लसने 'बिझनेस इन्सायडर'ला दिलेल्या माहितीनुसार, तो त्याच्या पत्नीबरोबर लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त पर्यटनासाठी आला होता. मात्र या देशात येऊन घडलेल्या या प्रकारामुळे दोघेही चांगलेच गोंधळले.  परदेशात येऊन एका उबर राईडसाठी एवढे पैसे भरावे लागल्यास पुढील संपूर्ण ट्रीपचा खर्च आणि सर्वच आर्थिक गणित कोलमडण्याची भीती या दोघांना होती. या सर्व प्रकारामुळे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेलेलो असतानाही आम्ही दडपणाखाली आलो. आम्हाला तिथे मुक्तपणे एन्जॉयही करता आलं नाही, असं डग्लसने म्हटलं आहे. 

दोघेही फारच नाराज

डग्लसची पत्नी अॅडम्सनही पतीप्रमाणेच घडलेल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करताना एवढी मोठी रक्कम भरण्यास सांगितल्याने आम्हाला धडकीच भरली, असं सांगितलं.  या दोघांनी संबंधित प्रकाराची तक्रार कंपनीकडे केली. काही दिवसांमध्ये हे प्रकरण कंपनीने निकाली काढलं. कंपनीने या जोडप्याला नुकसानभरपाई दिली. मात्र या गोंधळामुळे दोघेही फारच नाराज झाले असून यापुढे उबरची सेवा वापरावी की नाही याबद्दल दोघेही साशंक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  तक्रार करण्यासाठीही उबरच्या कस्टमर केअरबरोबर बरीच हुज्जत घालावी लागल्याने दोघांना मनस्ताप सहन करावा लागल्याचं सांगितलं. हे फारच निराशाजनक होतं असं या जोडप्याने सांगितलं.