ब्रिटन : कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढतंच आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्रिटनमध्येही कोरोना मृत्यूमुळे हाहाकार माजला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 20 हजारहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे 20 हजार लोकांचा मृत्यू होणं हे राष्ट्रासाठी अत्यंत दु:खद दिवस असल्याचं, इंग्लंडचे राष्ट्रीय आरोग्य सेवेचे संचालक स्टीफन पॉव्हिस (Stephen Powis) यांनी शनिवारी सांगितलं.
जगभरात 28 लाख 35 हजार 485हून अधिक जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर जगात आतापर्यंत 1 लाख 97 हजार 870 हून अधिक लोक कोरोनामुळे दगावले आहेत.
अमेरिकेसारखा बलाढ्य देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची आकडा 9 लाखांवर पोहचला आहे. तर अमेरिकेत सर्वाधिक 51 हजार 790 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृत्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे.
न्यूयॉर्क शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं आहे. 16 हजार 600हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी अमेरिकेत 1258 लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा अमेरिकेतील गेल्या तीन आठवड्यातील सर्वात कमी आकडा आहे.
अमेरिकेनंतर इटलीमध्ये सर्वाधिक 25 हजार 965 मृत्यू झाले आहेत. फ्रान्स, स्पेनमध्येही कोरोना मृत्यूचा आकडा 20 हजार पार पोहचला आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 25 हजारवर गेली आहे. तर 775हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.