Covid 19 virus : उत्तर कोरियामध्ये कोरोनाची पुष्टी झाल्यापासून ताप असलेले रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मंगळवारी 269,510 लोकांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली आहेत. याशिवाय आणखी 6 जणांना जीव गमवावा लागलाय. उत्तर कोरियामध्ये लोकांचे लसीकरण झालेले नाही, त्यामुळे उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे मानले जात आहे.
नॉर्थ अँटी व्हायरस मुख्यालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे की, तापामुळे आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलपासून 14.8 लाख लोकांना लक्षणं दिसत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, उत्तर कोरियातील बहुतांश लोक कोरोनामुळे आजारी आहेत. एवढेच नाही तर गरिबी आणि कमकुवत आरोग्य व्यवस्था या कारणांमुळे उत्तर कोरियामध्ये कोरोना चाचणी, लस आणि उपचाराची सुविधा नाही.
उत्तर कोरियामध्ये सध्या 6,63,910 लोक क्वारंटाईनमध्ये आहेत. उत्तर कोरियाने अद्याप रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत पुष्टी केलेली नाही. इतकेच नाही तर उत्तर कोरियामध्ये चाचणीची सुविधाही लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे संसर्ग वाढत आहे.
उत्तर कोरियाची कमकुवत आरोग्य व्यवस्था लक्षात घेता, विषाणूचा संसर्ग रोखण्यात अयशस्वी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. उत्तर कोरियाची लोकसंख्या 26 दशलक्ष आहे. यामध्ये बहुतांश लोकांना लस मिळाली नसल्याचे मानले जात आहे. उत्तर कोरियालाही कुपोषण आणि गरिबीच्या इतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच, विषाणूविरोधी औषधांचा आणि आयसीयूसारख्या सार्वजनिक आरोग्य उपकरणांचा तुटवडा आहे. एवढेच नाही तर काही तज्ज्ञांचे असे मत आहे की उत्तर कोरिया मृतांची संख्या कमी करत आहे, जेणेकरून किम जोंग उनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये.
उत्तर कोरियाने सलग दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा केला आहे. मात्र, गेल्या आठवड्यातच उत्तर कोरियाने कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचा दावा केला आहे. मात्र, उत्तर कोरियाने किती लोकांना कोरोनाची लागण झाली आहे याची पुष्टी केलेली नाही. उत्तर कोरियामध्ये कोरोना प्रकरणाची पुष्टी झाल्यानंतर किम जोंग यांनी निर्बंधांची घोषणा केली. उत्तर कोरियामध्ये लोकांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर तापाची लक्षणे असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, शिक्षक आणि वैद्यकीय विद्यार्थी तैनात करण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना क्वारंटाईन करता येईल.
रविवारी किम जोंग यांनी वैद्यकीय पुरवठा विलंब केल्याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांना फटकारले. एवढेच नाही तर किम जोंग उन यांनी प्योंगयांगमध्ये लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून फार्मसीमध्ये वेळेवर औषधांचा पुरवठा करता येईल. उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेनुसार, कोरियन सैन्याने सोमवारी वैद्यकीय युनिट अधिकारी तैनात करण्यास सुरुवात केली. जेणेकरून प्योंगयांगमध्ये वेळेवर औषधांचा पुरवठा करता येईल.
उत्तर कोरियाने UN लस कार्यक्रमाद्वारे दिलेली लसीची मदत देखील नाकारली होती, जेणेकरून आंतरराष्ट्रीय निरीक्षण टाळता येईल. एवढेच नाही तर दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला लस, औषधे आणि आरोग्य कर्मचार्यांना जाहीरपणे ऑफर देखील केली होती. पण उत्तर कोरियाने तो फेटाळली. मात्र, नुकतेच किम जोंग यांनी कोरोनाशी लढण्याच्या पद्धतीबद्दल चीनचे कौतुक केले होते. चीनची मदत घेण्याची किम जोंग यांची इच्छा असल्याचे मानले जात आहे.