वॉशिंग्टन: कोरोना व्हायरस हा हवेत राहू शकतो? सरळ शब्दात सांगायचे तर तो हवेत पसरू शकतो? जागतिक आरोग्य संघटनेने कदाचित त्यास नकार दिला असेल, परंतु शेकडो शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की,कोरोना हा वायूजन्य रोग आहे. न्यूयॉर्क टाइम्स (एनवायटी) च्या अहवालानुसार शेकडो शास्त्रज्ञ असा दावा करत आहेत की, कोरोना विषाणूचे लहान कण हवेमध्ये असतात, ज्यामुळे लोक संक्रमित होऊ शकतात. त्यांनी डब्ल्यूएचओला यासंदर्भातील शिफारसी बदलण्याची विनंती केली आहे.
डब्ल्यूएचओ असे सांगते आहे की, खोकला किंवा शिंका येताना संसर्ग झालेल्या व्यक्तीचे थेंब तोंडातून किंवा नाकातून बाहेर पडताना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. तर अनेक देशांच्या शास्त्रज्ञांचं मत मात्र दुसरं आहे. एनवायटीनुसार वैज्ञानिकांनी डब्ल्यूएचओला एक मुक्त पत्र लिहिले असून पुढील आठवड्यात एका वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये 32 देशांतील 239 शास्त्रज्ञांनी हवेतून कोरोना विषाणूचे लहान कण लोकांना संसर्गित करू शकतात असा पुरावा दिला.
हे शास्त्रज्ञ म्हणतात की, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकामधून मोठे थेंब बाहेर येण्याबरोबरच, श्वासोच्छवासादरम्यान पाण्याचे लहान थेंबदेखील हवेमध्ये पसरतात आणि एखाद्या व्यक्तीस संक्रमित करतात. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की हवेमध्ये विषाणू सापडल्याच्या पुराव्यावर विश्वास ठेवता येणार नाही.
डब्ल्यूएचओच्या संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे प्रमुख बेंडेटा अलेग्रेंजी (Benedetta Allegranzi) या संदर्भात म्हणाले की, 'विशेषतः गेल्या काही महिन्यांत आम्ही बर्याच वेळा असे म्हणतो की, 'हवेतून संसर्ग शक्य आहे, परंतु अद्याप कोणतेही ठोस किंवा स्पष्ट पुरावे सापडलेले नाहीत.'