Rahul Gandhi in US: "मोदी देवालाही ब्रम्हांडात काय सुरु आहे हे समजावू शकतात," राहुल गांधींचं अमेरिकेत विधान

Rahul Gandhi in US: भारतात राजकारणाची जी काही सामान्यं साधनं आहेत, ती आता काम करत नाही आहेत. आता लोकांना धमकावलं जात आहे. यंत्रणांचा वापर केला जात आहे. अशा स्थितीत भारतात राजकारण करणं आता सहज राहिलेलं नाही. अशा स्थितीत आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असं काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 31, 2023, 11:52 AM IST
Rahul Gandhi in US: "मोदी देवालाही ब्रम्हांडात काय सुरु आहे हे समजावू शकतात," राहुल गांधींचं अमेरिकेत विधान title=

Rahul Gandhi in US: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress) मंगळवारी अमेरिका (USA) दौऱ्यावर पोहोचले आहेत. सॅन फ्रान्सिस्को (San Fransisco) येथे त्यांनी भारतीयांची भेट घेत त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. भारतात सध्या राजकारण करणं सोपं राहिलेलं नसून, यासाठीच आम्ही 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) काढल्याचं म्हटलं. "भारतात राजकारणाची जी काही सामान्यं साधनं आहेत, ती आता काम करत नाही आहेत. आता लोकांना धमकावलं जात आहे. यंत्रणांचा वापर केला जात आहे. अशा स्थितीत भारतात राजकारण करणं आता सहज राहिलेलं नाही. अशा स्थितीत आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला," असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"जग इतकं मोठं आहे की, कोणतीही व्यक्ती आपल्या जगातील प्रत्येकाबद्दल प्रत्येक गोष्ट माहिती आहे असा विचार करु शकत नाही. हा एक आजार आहे. पण भारतात काही लोकांना आपल्याला सगळ्यातलं सगळंच कळतं असं वाटतं. मला तर वाटतं त्यांना देवापेक्षाही जास्त माहिती आहे. ते देवेासमोर बसून त्याला काय सुरु आहे हे समजावू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यातीलच एक आहेत," असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. 

राहुल गांधींनी सांगितलं की "जर नरेंद्र मोदींना देवासमोर बसायला सांगितलं तर ते देवालाही ब्रम्हांडात काय सुरु आहे हे समजावू शकतात. देवालाही आपण हे काय निर्माण केलं आहे याचं आश्चर्य वाटेल. भारतात हेच सुरु आहे. भारतात असे काही लोक आहेत ज्यांना सर्वच माहिती आहे. जेव्हा ते वैज्ञानिकांसमोर जातात तेव्हा त्यांना विज्ञानाबद्दल सांगतात. इतिहासकारांकडे जातात तेव्हा त्यांना इतिहासाबद्दल सांगतात. लष्कराला युद्धाबद्दल, लष्कराला उड्डाणाबद्दल सांगतात. पण त्यांना काहीच कळत नाही हे सत्य आहे. कारण जर तुम्ही समोरच्याचं ऐकून घेऊ इच्छित नसाल तर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही".

"जेव्हा आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली तेव्हा काय होईल ते पाहू असा विचार केला होता. 5 ते 6 दिवसांनी हजारो किमींची यात्रा करणं सोपं नाही असं लक्षात आलं. माझ्या गुडघ्याला जखम झाली असल्याने त्रास होत होता. पण आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आम्ही रोज 25 किमी यात्रा करत होतो. तीन आठवड्यांनी आम्हाला आश्चर्य वाटणारी गोष्ट घडली. थकवा जाणवत नसल्याचं आमच्या लक्षात आलं. मी सोबत चालणाऱ्या लोकांना विचारलं तर त्यांनाही थकवा जाणवत नव्हता," असं राहुल गांधींनी सांगितलं. 

भाजपाने आमची भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी पोलीस आणि यंत्रणांचा वापर केला. पण त्यांचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला असा दावा राहुल गांधी यांनी केला.