वॉशिंग्टन : अमेरिकेने उत्तर कोरियाला दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांच्या यादीत टाकले आहे. अमेरिकेच्या या नव्या खेळीमुळे दोन्ही देशांती तणाव पुन्हा एकदा टोकदार झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनी ही खेळी करताना उत्तर कोरियावर अधिक प्रतिबंध लावणार असल्याचे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे पाच अशियाई देशांच्या 12 दिवसीय दौऱ्यावर होते. या दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला. ट्रम्प यांनी म्हटले की, अण्वस्त्रवापराची जगाला धमकी देत उत्तर कोरियाने अनेक वेळा दहशतवादाचे समर्थन केले आहे. ज्यात विदेश भूमीत झालेल्या हत्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी म्हटले आहे की, उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राने अण्वस्त्राबाबत अनेकदा निर्बंध घातले. पण, कोरियातील नेते किम जोंग यांनी ते वारंवार उधळून लावले. तसेच, आपला अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रमही सुरू ठेवला आहे.
उत्तर कोरियाबाबत घेतल्या गेलेल्या नव्या निर्णयामुळे हा देश आता इराण, सूदान आणि सीरिया या देशांच्या यादीत जाऊन बसला आहे. या सर्व देशांना आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाला समर्थन देणारे देश म्हणून ओळखले जाते. महत्त्वाचे असे की, उत्तर कोरियावर निर्बंध लावण्याबाबतचा मसूदा अमेरिकेने तायार केला होता. त्याला रशिया, चीन या देशांसह 15 सदस्यांनी मंजूरी दिली होती.